
मुंबई: साऊथ सिनेइंडस्ट्रीतून मोठी बातमी समोर येत आहे. तेलंगणातील 29 सिनेकलाकार, यूट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर यांच्या विरोधात बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप्सला प्रोत्साहन दिल्याबद्दल ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
सायबराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती , मंचू लक्ष्मी, प्रकाश राज , निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणीता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, यूट्यूबर हर्षा साई, बय्या सनी यादव आणि लोकल बॉय नानी यांच्या नावांचा समावेश आहे. हे ॲप्स सामान्य लोकांना आर्थिक अडचणीत आणत असल्याच्या तक्रारीनंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मियापूरमधील 32 वर्षीय व्यावसायिक फनिंद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती.त्यांच्या तक्रारीनुसार, अनेक तरुण आणि सामान्य लोक या सट्टेबाजी ॲप्समध्ये पैसे गुंतवत आहेत, ज्यांचे प्रमोशन प्रसिद्ध चित्रपटातील सेलिब्रिटी करत आहेत.
या ॲप्समुळे मध्यमवर्गीय आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत, असं तक्रारीत नमूद केलं आहे. सायबराबाद पोलिसांनी 19 मार्च 2025 रोजी 25 सेलिब्रिटींविरुद्ध तेलंगणा गेमिंग ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार एफआयआर दाखल केला.ईडीनं आता या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला आहे.
या तपासामध्ये, ह्या कलाकारांना जाहिरातीसाठी मिळालेले पैसे, त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ॲप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हे ॲप्स तरुणांना सोप्या कमाईचं आमिष दाखवून त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करत आहेत.