मालवणी 'डांबरट'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद !

कणकवलीमधील दोन्हीही प्रयोग हाऊसफुल्ल
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 23, 2024 10:35 AM
views 235  views

  • स्थानिक कलावंतांचा सहभाग 


कणकवली : सबकुछ मालवणी असलेला आणि सद्य परिस्थितीवर अत्यंत मार्मिकपणे बोट ठेवणारा डांबरट चित्रपटाचा प्रयोग कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात झाला. यावेळी विविध मान्यवरांनी कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.


या शुभारंभाच्या प्रयोगाचे उद्घाटन महादेव परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर ज्येष्ठ कलाकार सुहास वरुणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी या चित्रपटातील कलाकार मिलिंद गुरव, राकेश काणेकर, दिग्दर्शक- संकलक- रविकिरण शिरवलकर, छायांकन- अवधूत लाड, संवाद - श्याम सामंत, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी तथा ज्येष्ठ कलाकार विजय चव्हाण, श्याम नाडकर्णी, प्रा. हरिभाऊ भिसे, प्राचार्य पी. जे. कांबळे, दीपक बेलवलकर व सर्व कलाकार उपस्थित होते.

अलीकडे मार्केटिंग आणि कमी कालावधीत प्रचंड पैसे कमावण्याच्या कल्पना बाजारात आल्या असून त्यामधून कशी फसवणूक होते. माणूस त्यामध्ये गुरफटत  कसा जातो. कोणताही विचार न करता त्यामध्ये अडकत कसा जातो याबाबतची ही कथा असून कणकवलीतील तब्बल १५० कलाकारांना घेऊन आर. शिरवलकर फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत हा अस्सल मालवणी चित्रपट 'डांबरट' प्रदर्शित झाला. कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे संध्याकाळी सहा व रात्री साडेनऊ वाजता हाऊसफुल गर्दीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रविकिरण-शिरवलकर, लेखक- श्याम सामंत, छायाचित्रण- अवधूत लाड तर कास्टिंग - अक्षता कांबळी यांनी केल आहे. 

 'डांबरट' या मालवणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कणकवली तालुक्यात झाले आहे. तर यामध्ये जवळपास १५० कलाकार असून सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच आहेत. याचे लेखन, दिग्दर्शन, निर्माता, कास्टिंग हे सर्व मालवणी कलाकार असून हा सबकुछ मालवणी असलेली कलाकृती आहे.  लोक आग्रहास्तव पुढील प्रयोग थोड्या दिवसात असाच हाउसफुल करु असे आश्वासन रविकिरण शिरवलकर यांनी दिलं. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुहास वरुणकर, अक्षता कांबळी, मिलिद गुरव, अमजद शेख, सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी, मंदार शेटये, राहुल कदम, तेजस रावले, प्रसन्ना देसाई , सिद्धेश खटावकर अशा अनेक कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.


यावेळी चित्रपटाच्या पहिल्या प्रयोगानंतर विजय चव्हाण, प्रा. हरिभाऊ भिसे, ज्येष्ठ कलाकार श्याम नाडकर्णी, पत्रकार निकेत पावसकर, पत्रकार उमेश बुचडे यांनी या मालवणी कलाकृतीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. डांबरट या मराठी चित्रपटाच्या पहिल्या प्रयोगाच्या समाप्ती नंतर ज्येष्ठ कलाकार सुहास वरुणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.