मुंबई : बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. यासोबतच त्यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यापूर्वी सतीश कौशिक यांना कोरोनाच्या काळात कोविडची लागणही झाली होती.
अनुपम खेर आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, मला माहित आहे 'मृत्यू हे या जगाचं शेवटचं सत्य आहे!' पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम ! ओम शांती! या ट्विटसोबतच त्यांनी अभिनेत्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सतीश कौशिक यांनी सर्वांसोबत होळी खेळली होती.
सिने कलाकार आणि चित्रपसृष्टीतील इतर लोकांसोबत खेळलेल्या या होळीचे सर्व फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्टही केले होते. अशात अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे. सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. ते मुख्यतः मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात, ज्यामध्ये त्यांनी कॅलेंडरची भूमिका केली होती. सतीश यांना दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.