रत्नागिरी : आर्ट सर्कल संस्थेतर्फे आयोजित पंधराव्या शास्त्रीय संगीत महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारपासून (ता. २१) हा महोत्सव ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर रंगणार असून गुलाबी थंडीसह शास्त्रीय संगीत, वाद्यवादन, नृत्याचा अनोखा संगम या महोत्सवात अनुभवता येणार आहे. उद्घाटनानंतर गायन, वादन व नृत्याचा त्रिवेणी संगम असलेला तालचक्र हा कार्यक्रम रसिकांना विशेष आनंद देऊन जाणारा आहे.
उद्घाटनानंतर यशस्वी सरपोतदार यांचे गायन होईल. या मैफिलीसाठी त्यांना प्रणव गुरव तबलासाथ, अथर्व कुलकर्णी संवादिनीसाथ करणार आहेत. हे दोघेही तरुण वादक कलाकार कसलेले असून त्यांची समर्थ साथ लाभणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप गायन- वादन, नृत्य या कलांच्या संगमाने होणार आहे. पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला तालचक्र महोत्सवाचा आनंद द्विगुणित करणार आहे. विजय घाटे यांचा तबला, ताकाहिरो आराइ यांची संतूर, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर यांचे नृत्य आणि अभिषेक सिनकर यांची संवादिनी यांच्या एकत्रित परिणामाने तालचक्र रसिकांना गुंतवून ठेवतो. प्रत्येक मैफिलीचा तोल सांभाळण्याचे काम ताल करतो. अशा या तालांच्या विविध विभ्रमांची माहिती करून देणारा तालचक्र हा अनोखा कार्यक्रम आहे.
२२ जानेवारीला प्रारंभी भेंडी बाजार घराण्याचे अत्यंत आश्वासक वादक सितार वादक मेहताब अली नियाझी सादरीकरण करणार आहेत. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधून भारताचे प्रतिनिधित्त्व देखील केले आहे. मेहताब यांना सितारवादनासाठी स्वप्निल भिसे यांची तबलासाथ लाभणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता या महोत्सवाचा समारोप करतील. किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनात देखील कर्नाटक संगीताची झाक दिसून येते. संगीत विषयावर त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा समावेश कर्नाटक शासनाच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. पद्मश्री पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. पंडितजींना संवादिनी साथ पं. अजय जोगळेकर तर तबलासाथ बनारस घराण्याचे भरत कामत करणार आहेत.
राजवाडा सजला
रत्नागिरी शहराची शान असलेला थिबा राजवाडा आंतरराष्ट्रीय पातळीवर गणला जातो. या महोत्सवाच्या निमित्ताने राजवाडा सजवला आहे. रंगकाम, प्रकाशयोजना, संपूर्ण आवारात रांगोळी अशी सजावट राजवाड्याच्या वैभवशाली देखणेपणात भर घालत आहे. या महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी रत्नागिरीसह परजिल्ह्यातूनही अनेक संगीतप्रेमी, गायक, वादक येणार आहेत.