चेटूकवाडीच्या 'मुंजा'चा बॉक्स ऑफिसवर कल्ला..!

कोकणातील दंतकथेवर आधारित चित्रपट ; शेवटचा सीन महत्वाचा !
Edited by:
Published on: June 11, 2024 12:32 PM
views 322  views

सावंतवाडी : 'मुन्नी लगीन...!' ७ जूनला प्रदर्शित झालेला ‘मुंजा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या तुफान कमाई करत आहे. कोकणात प्रचलित असलेल्या मुंजाच्या दंतकथेचा आधार घेत चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. केवळ चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन केलं आहे. 

कोकणात प्रचलित असलेल्या मुंजाच्या दंतकथेचा आधार घेत चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. कोकणात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ, सावंतवाडी, खवणे बीच व मुणगी या गावांत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून त्यात सिंधुदुर्गातील अनेक स्थानिक कलावंतांना काम करायची संधी मिळाली आहे. एवढंच नव्हे तर मराठी कलावंतांची संख्या यात अधिक आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह यांच्याबरोबरच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे, रसिका वेंगुर्लेकर हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं लेखन निरेन भट, दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. लाईन प्रोड्यूसर म्हणून कोकणच्या साईनाथ जळवी यांनी काम पाहिले आहे. गोट्याच्या रूपात बालकलाकार आयुषने प्रभावी काम केलं आहे. अभय वर्माने साकारलेला बिट्टू मनात घर करून राहतो. शर्वरीने मैत्रीला जागणारी बेला छान रंगवली आहे. सुहास जोशींनी आजीच्या छोट्याशा भूमिकेत सहजपणे जीव ओतला आहे. मोना सिंगने साकारलेली कणखर आईही चांगली झाली आहे. अजय पूरकरने वठवलेला काका आणि भाग्यश्री लिमयेच्या रूपातील रुक्कूही भाव खावून जात आहे. सत्यराज यांचं एक वेगळंच रूप यात आहे. प्रथमच कॅमेरा फेस करणाऱ्या तरणजोत सिंगने चांगलं काम केलं आहे. छोट्याशा भूमिकेत श्रुती मराठेचं वेगळं रूप दिसतं. कोकणच्या प्रथा, परंपरावर आधारित दंतकथेचा आधार घेत या चित्रपटाची मांडणी केली आहे. शेवच्या सीनला अभिनेत्री सुहास जोशी यांच्या तोंडी असलेला डायलॉग अंधश्रद्धेला मार देणारा आहे. दिग्दर्शकाच कसब यातून दिसून येत आहे.

कोकणात चित्रीत झालेल्या मुंजानं पहिल्याच दिवशी ४.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ८१.२५ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने ७.४० कोटींचा व्यवसाय केला. ‘सॅकनिल्क’च्या, ट्रेंड रिपोर्टनुसार, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सुट्टीच्या दिवशी ‘मुंजा’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ८.४३ कोटी रुपयांची कमाई केली. ‘मुंजा’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २०.०४ कोटी झाले होते. चौथ्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चौथ्या दिवसाची कमाई पाहता ती तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत कमी असली तरी सोमवारी सुट्टीचा दिवस नसताना चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय असं दिसतंय. चित्रपटाने सोमवारी ३.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर २३.७९ कोटी रुपये कमावले आहेत.