ब्युरो : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. इन्स्टाग्रामवर अक्षयने एक व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अक्षयच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आजपासूनच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. आता अक्षयने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे. यानंतर अक्षय कुमारच्या लुकची तुलना शरद केळकर बरोबर करण्यात आली.