
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मोठी फसवणूक झाली आहे. ही फसवणूक कोणी ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांकडून करण्यात आलेली नाही. तर तिच्या माजी पर्सनल असिस्टंटने केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी वेदिका प्रकाशला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदिका प्रकाशवर आलियाची 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वेदिकाने गेल्या 2 वर्षांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिच्या प्रॉडक्शन हाऊस खात्यातून लाखो रुपये लुटले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेदिकेला अटक केली असून तिला 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून सुमारे पाच महिन्यांपासून तिचा शोध सुरू होता, अखेर ती काल पोलिसांच्या हाती लागली. तिला बंगळुरू या ठिकाणाहून अटक करण्यात आली.
वेदिका प्रकाश शेट्टी ही 32 वर्षांची आहे. ती गेल्या काही वर्षांपासून आलिया भट्टची पर्सनल मॅनेजर म्हणून काम करत होती. वेदिकाने मे 2022 ते ऑगस्ट 2024 पर्यंत आलियाच्या वैयक्तिक आणि प्रॉडक्शन हाऊसच्या एटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड खात्यातून पैसे लुटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वेदिका प्रकाश मुंबईतील एनजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते. 2024 मध्ये तिला वैयक्तिक व्यवस्थापक पदावरून काढून टाकण्यात आले. आलिया व्यतिरिक्त, वेदिका अनेक कलाकारांची व्यवस्थापक देखील राहिलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलियाच्या खात्यातून पैसे चोरी गेल्याचे हे लक्षात आल्यानंतर आलिया भट्टची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी जानेवारीमध्ये जुहू पोलिसांकडे वेदिका प्रकाशविरुद्ध फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार दाखल केली. तिच्याविरुद्ध कलम 316 (4), 318 (4) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता.
आलिया भट्टने 2021 मध्ये इटरनल सनशाइन प्रायव्हेट लिमिटेड हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. शाहरुखच्या रेड चिली प्रॉडक्शनच्या सहकार्याने, या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली, आलियाने डार्लिंग्ज हा चित्रपट तयार केला आहे, ज्यामध्ये ती आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत होते.
आलियाची आई सोनी राजदान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हा गुन्हा दाखल केला होता. सुमारे 5 महिन्यांनंतर आरोपी महिलेस बंगळुरू येथून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. वेदिकावर आलियाची बनावट सही करून दोन वर्षांत 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.