सिंधुदुर्ग : सध्या बॉक्स ऑफिसवर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हिंदी-इंग्रजी चित्रपटांच्या यादीत हा एक मराठी चित्रपट चर्चेत आहे. पावसाळी वातावरणात आपल्या प्रियजन, कुटुंबियांसोबत पाहण्यासारखा हा चित्रपट तिकीटाचे पैसे वसूल करणारा आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात भरघोस कमाई केली आहे.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा, संवाद, या चित्रपटाचं दिग्दर्शन, गाणी या सगळ्यालाच प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. 'मंगळागौर' या लुप्त होत चाललेल्या एका विषयावर आधारित हा चित्रपट आहे. मंगळागौर या एका विषयाधरून चित्रपटाच केलेलं लेखन, दिग्दर्शन याला तोंड नाही. तर या चित्रपटाची दुसरी बाजू म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते या वयात दाखवलेल्या एनर्जीला तोड नाही. चित्रपट, मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रींच्या अभिनयामुळे या चित्रपटाला IMDB या साईटवर 8.8 रेटींग आहेत. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू असून हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर या प्रतिसादाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने किती कमाई केली, याबद्दल सांगितले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी एक ते दीड कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.१० कोटी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.८० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला होता. यानंतर आता चार दिवसात या चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ झाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
विशेष म्हणजे येत्या काही दिवसात हा चित्रपट १५ कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज चित्रपट समीक्षकांचा आहे. सोशल मीडियावरूनही प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहे. मुलगी, बहिण, पत्नी, जाऊ, सुनं, सासु असं स्त्रीच आयुष्य उलगडणारा हा बोलका चित्रपट आहे.