वैभववाडी : तालुक्यातील कोकीसरे गावचा सुपुत्र तेजस जांभवडेकर हा युवा कलाकार मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांसोबत मराठी मालिकेत अभिनय करतोय. कलर्स मराठी वाहीनीवर "अशोक मा.मा." मालिकेत तो एका शिक्षकाची भूमिका बजावत आहे.सध्या ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात दर्शकांच्या पसंतीस उतरली आहे.
तेजस हा मुळ कोकीसरे गावातील राहणारे आहेत. कोकीसरे येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण तालुक्यातील शाळांमध्ये घेऊन ते नोकरी निमित्त मुंबईला गेले. शाळेत असल्यापासून अभियानाची असलेली आवड त्यांनी आपल्या पुढील जीवनात जोपासली. शालेय जीवनात गावात होत असलेल्या छोट्या मोठ्या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरूवात केली . मुंबईत गेल्यावर छोट्या मोठ्या पडद्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. मराठी वाहीन्यांवरील काही मालिकांमध्ये काम केले आहे.आता थेट अशोक सराफांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. कलर्स मराठी वाहीनीवर मागील आठवड्यापासून अशोक मा.मा.ही एक विनोदी व जिव्हाळ्याची मालिका सुरू झाली आहे. चिन्मय मांडलेकर यांनी लेखन केलेली व केदार वैद्य व सागर सकपाळ यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत तेजस हे सागर सातपुते या शिक्षकाची भूमिका करीत आहेत.शिस्त प्रिय असलेले अशोक मामांची ही मालिका दर्शकांच्या पसंतीस उतरत आहे.
अशोक सराफांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तेजस हे धन्यता मानत आहेत. वैभववाडीच्या या सुपुत्राची कामगिरी पाहून तालुकावासियांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे.