विकासाचा 'रोडमॅप' तयार, शहराचा कायापालट करणार !

सुट्टीवर असले तरीही ऑनलाईन पद्धतीने कार्यरत राहणार
Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2026 13:41 PM
views 20  views

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंची माहिती  

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा 'रोडमॅप' सादर केला. सावंतवाडी हे माझे कुटुंब असून शहराला राज्यातील एक 'आदर्श मॉडेल शहर' बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास व्यक्त केला. सर्व विषयांचा आम्ही अभ्यास केला असून विकासात्मक काम पूर्णत्वास आणण्यासाठी माझा पुढाकार असणार आहे. पुढच्या ५ वर्षात शहराचा कायापालट करण्याची जिद्द आम्ही ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाळंतपणात काहीकाळ सुट्टीवर असले तरीही ऑनलाईन पद्धतीने सहकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या संपर्कात राहणार असल्याची माहिती युवरांज्ञी श्रद्धाराजेंनी दिली.‌ नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना 'स्वच्छता' हे पहिले पाऊल आहे. 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' ही संकल्पना राबवताना वेंगुर्ले शहराच्या धर्तीवर नवनवीन उपक्रम राबवले जातील. बस स्थानक, नरेंद्र उद्यान आणि शहरातील सर्व लहान-मोठ्या उद्यानांची स्वच्छता करण्यासाठी वॉर्डनिहाय विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. पाणीपुरवठ्याबाबत मुख्याधिकारी व ठेकेदारांशी चर्चा करून एक ठोस आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या एका वर्षात सावंतवाडीकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे ध्येय त्यांनी जाहीर केले. तसेच, शहरात गॅस पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेणार असून या कामामुळे होणारा तात्पुरता त्रास सहन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

तसेच कचरा डेपोची समस्या सोडवण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण आणि रिसायकलिंगवर भर दिला जाईल. शहराच्या सीमेवर टाकला जाणारा कचरा ही मोठी समस्या असून त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील. पार्किंगचीही व्यवस्था केली जाईल. तर, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि महिला रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील सुमारे १२०० भटक्या कुत्र्यांचा प्रश्न 'मिशन रेबिज'च्या माध्यमातून दीड वर्षात निकाली काढला जाईल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'पे अँड पार्क' आणि 'नो पार्किंग झोन' निश्चित करून कडक कारवाई केली जाणार आहे. सावंतवाडीच्या वैभवात भर टाकणारे मँगो टू हॉटेल (पर्यटन सुविधा केंद्र), रघुनाथ मार्केट आणि हेल्थ पार्क यांसारखे बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले जातील. तसेच शहरात नवीन 'फूड पार्क' उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. विकासाच्या कामात कोणतेही राजकारण आणणार नसून सर्व नगरसेवक आणि नागरिकांना विश्वासात घेऊनच शहराचा कायापालट करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, ॲड‌. सिद्धार्थ भांबुरे, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, निलम नाईक, सुकन्या नाईक, सुनिता पेडणेकर आदि नगरसेवक उपस्थित होते. 

रजेवर जाणार पण, कार्यरत राहणार  !

बाळंतपणासाठी मी काही दिवस रजेवर जाणार आहे. आई होण्याचा क्षण प्रत्येक महिलेच्या जीवनातील सुवर्णक्षण असतो. गरोदर असतानाही मी निवडणूक लढवली होती. घरोघरी जाऊन लोकांना भेटले होते. याकाळात देखील स्वतःच्या आरोग्यापेक्षा जनतेसाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. मला सर्वांनी चांगला पाठिंबा दिला, लोकांनी भरभरुन मत देऊन विजयी केलं. त्यामुळे निवडणूकीत दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करण्यासाठी माझा भर राहणार आहे. आज ९ व्या महिन्यात देखील मी कार्यरत आहे. आता थोडे दिवस नसले तरीही ऑनलाईन यंत्रणेद्वारे मी सहकाऱ्यांच्या, प्रशासनाच्या सतत संपर्कात असेन. लोकांची कामं करण्यासाठी सर्वांच्या संपर्कात राहणार आहे. सावंतवाडी हे माझे कुटुंब आहे आणि शहराच्या समस्या सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. सरकारनं महिलांना संधी देताना या सर्वांचा विचार केला होता. ईश्वरानं महिलांची निर्मिती करताना तिला सक्षम बनवलं होतं. त्यामुळे मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन, या काळात सावंतवाडीकर आपल्या या मुलीला नक्कीच साथ देतील, अशी भावना नगराध्यक्षांनी व्यक्त केली.