
प्रजासत्ताक दिनी सावंतवाडीत उपोषण
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची भेट घेत सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयासंदर्भातील समितीचा अहवाल शासनाने स्वीकारुन तातडीने कार्यवाही करण्याची तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठराव घेण्याची मागणी केली. याला नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांसंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंच येथे ही जनहित याचिका दाखल आहे. याचिका प्रकरणी न्यायालयाने समिती गठीत केली. या समितीने ८ ऑक्टोबर २०२५ ला पाहणी करुन उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन नुसार अहवाल सादर केला. याबाबत पुढे कोणती कार्यवाही झाली किंवा कसे यासंदर्भात अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गने पत्रव्यवहार करून उपसंचालक आरोग्य यांना विचारणा केली. मात्र, अहवालातील शिफारशी संदर्भात कोणतीही अंतिम भूमिका घेण्यात आलेली नाही, असे उपसंचालक आरोग्य यांनी पत्रान्वये कळवले आहे. उपसंचालक यांचे पत्राचे अवलोकन केले असता समितीने अहवाल देऊन सुध्दा अंतिम कार्यवाही काहीही झालेली नाही असे प्रतित होते. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी २०२६ रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालया समोर उपोषणास बसण्याचा इशारा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने निवेदनाव्दारे दिला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार समितीने सादर केलेल्या अहवालात वैद्यकीय अधिकारी यांची नियमित नऊ पदे रिक्त असल्याचे नमूद आहे.
ट्रामा केअर युनिट मधील वैद्यकीय अधिकारी यांची सर्वच्या सर्व पाच पदे रिक्त असल्याचे नमूद आहे. रक्तपेढी सह अन्य रिक्त पदे तातडीने भरण्याची शिफारस समितीने केली आहे. अहवाल शासनाने स्विकारुन आय.सी.यु., ट्रामा केअर युनिट अद्ययावत आणि पूर्ण क्षमतेने कायर्यान्वित करून रुग्णांना अत्यावश्यक सेवा द्यावी, ही सावंतवाडीकरांची भावना आहे. तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत आरक्षित 'भूखंड क्र. ५ अ' हा शासनाने याच कारणासाठी आरक्षित ठेवला आहे. मात्र, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाही ती पूर्ण व्हावी. यासंदर्भात सावंतवाडीकर जनतेच्या भावना तीव्र आहेत. यासंबंधी आपण नगराध्यक्ष या नात्याने जनतेच्या भावना पत्राव्दारे शासनास कळवाव्यात. तसेच कौन्सिल सभेत ठराव घेऊन सावंतवाडीकरांचा हा जीवन मरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती कृती समितीकडून करण्यात आली. तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असल्याने १० वर्ष रखडलेला हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपस्थितांनी केले.
यावेळी अभिनव फाउंडेशनचे राजू केळुसकर, जितेंद्र मोरजकर, किशोर चिटणीस, उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ राजेंद्र बिर्जे, संतोष वैज, अध्यक्ष नरसू रेडकर, रविंद्र ओगले, संजय लाड, तुषार विचारे, प्रा. सुभाष गोवेकर, कृझ फर्नांडिस, मोहसीन मुल्ला, चंद्रकांत घाटे, संतोष तळवणेकर, दिगंबर पावसकर तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.










