
वैभववाडी : भुईबावडा बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले असून त्यामध्ये दोन वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर अचानक हल्ला चढवला. कुत्र्याच्या पिसाळलेल्या अवस्थेमुळे नागरिकांना पळापळ करावी लागली. या हल्ल्यात जयवंती दत्ताराम पांचाळ (ऐनारी), राजेंद्र रमेश पाथरे (तिरवडे तर्फ खारेपाटण), संतोष बांबू शेळके (भुईबावडा), रघुनाथ भिकाजी मोहीते (ऐनारी) परशुराम राठोड (भुईबावडा) हे जखमी झाले आहेत. या सर्वांना नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या कुत्र्याला ठार मारले. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.










