
ब्युरो न्यूज : ‘खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटातील विशिष्ट संवादांवर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी संवाद हटवण्याचा निर्णय घेतलेला असून, त्यांनी याबाबत एक अधिकृत पत्रक जाहीर केले आहे.
निर्मात्यांनी स्पष्ट केले की, या चित्रपटाचा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. शिवाजी महाराजांच्या जीवनातून मिळणारे प्रेरणादायी मूल्य सर्वधर्मीयांपर्यंत पोहोचावेत, हाच यामागील उद्देश होता. त्यांनी सांगितले की, "सिनेमाच्या आशयामुळे कोणाच्या भावना दुखावाव्यात, असा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे संबंधित दृश्ये आणि संवाद पुन्हा एकदा तपासले जात असून, आक्षेपार्ह भाग हटवला जाणार आहे."
चित्रपटात दाखवलेली ऐतिहासिक माहिती जसे की, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम सैनिकांची उपस्थिती अथवा रायगडावर मशीदीचा उल्लेख याबाबत ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देण्यात आला आहे. मात्र, अचूक आकडेवारीबाबत चित्रपट संघाने खुलासा केला आहे की ती संख्या अनुमानावर आधारित होती, ऐतिहासिक दस्ताऐवजांवर नव्हे. त्यामुळे चुकीचा अर्थ लावला जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
दिग्दर्शकाने शेवटी रसिक प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की, ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा संपूर्ण अनुभव घेऊनच मत मांडावं. “आमच्या कथनशैलीवर टीका झाली तरी चालेल, पण उद्देशावर शंका घेऊ नये,” असं स्पष्ट करत त्यांनी सिनेमा पाहून मग मत मांडण्याचं आवाहन केलं आहे.