मुंबई : 'पुष्पा' या पॅन इंडिया चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले. 'पुष्पा'स्टार अल्लु अर्जुनच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते. यामध्ये भर पडली आहे मुंबईतील प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरची. बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी, अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता असून त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेये सादर केली आहेत. अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि प्रतिमा असलेल्या विशेष ग्लासमध्ये हे ज्यूस सर्व्ह करण्यात येत असून त्यावर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत.
अल्लू अर्जुनवर असलेले आपले प्रेम अशा प्रकारे दर्शवण्याचे कारण विचारले असता बंटी ज्यूस सेंटरचे बंटी म्हणाले की, "अल्लू अर्जुन सरांच्या पहिल्या चित्रपटापासूनच मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांचे सगळे डायलॉग आवडतात पण 'पुष्पा' मधील "फायर है, झुकेगा नही" हा डायलॉग माझा आवडता आहे.
'पुष्पा' चित्रपट देशभर यशस्वी झाल्यानंतर, अल्लू अर्जुनची लोकप्रियता आणि स्टारडम आकाशाला भिडले आहे. एवढेच नव्हे तर, चित्रपटातील त्याच्या 'पुष्पा'लूकने गणेश चतुर्थी दरम्यान देशभरातील भगवान गणेशाच्या मूर्तींनाही प्रेरणा दिली होती. अल्लू अर्जुनच्या फॅन क्लबने गणपतीच्या मूर्तींची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले होते, जिथे गणपती बाप्पांना 'पुष्पा'सारख्या पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये पाहायला मिळेल. तसेच, 'पुष्पा'मधील ब्लॉकबस्टर गाणी सामी सामी आणि श्रीवल्ली यांनी नवरात्रीदरम्यान आपले वर्चस्व गाजवले. दिवाळीतही सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चेहरा असलेले फटाके देशभर विकले गेले.
अलीकडेच, पुष्पाच्या दुसर्या भागाची घोषणा झाली असून, अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पुन्हा एकदा 'पुष्पा'च्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.