एडिनबर्ग : बॉलीवुडसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. अभिनेता अक्षय कुमारचा एका चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अपघात झाला आहे. हल्ली चित्रपटात काम करणे म्हणजे फक्त अभिनय करणे नाही. त्यासाठी अनेक सायास करावे लागतात. बऱ्याचदा जीवाची बाजी लावून स्टंट करावे लागतात. यासाठी चित्रपटात अनेकदा बॉडी डबलचा वापर करतात. म्हणजे अभिनेत्याच्या ऐवजी दुसराच कलाकार हे स्टंट करत असतो. पण अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे. तो स्वतःचे स्टंट स्वतःच करतो. म्हणूनच त्याला खिलाडी असेही म्हटले जाते.
मात्र, स्कॉटलंडमध्ये त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना त्याला दुखापत झाली आहे. टायगर श्रॉफसोबत ऍक्शन सीनचं शूटिंग करत असताना अक्षय कुमारचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अक्षय कुमार जरी जखमी झाला असला, तरी त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरुच राहणार आहे. अक्षयही सेटवर पूर्णवेळ असणार आहे फक्त स्पेशल ऍक्शन सीक्वेन्सचं शूटिंग सध्या थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
माहितीनुसार, 'अक्षय कुमार टायगर श्रॉफसोबत एका ऍक्शन सीनचे चित्रीकरण करत होता. दरम्यान एक विशेष स्टंट करताना त्याला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. स्कॉटलंडमधील शूटिंग वेळेवर पूर्ण व्हावं म्हणून अक्षय सध्या क्लोज-अप्ससह शूट करत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय आणि टायगरशिवाय सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, गोविंदा प्रमुख भूमिकेत होते. तर त्याच्या आगामी सिक्वेलमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी दिसणार आहे.