ब्युरो न्यूज : टी.व्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिनं १६ ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अवघ्या ३० व्या वर्षी वैशालीनं एवढं भयंकर पाऊल उचलल्यानं टी.व्ही जगतात खळबळ उडाली आहे. वैशालीनं ज्याच्यामुळे आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं तो नराधम आता तुरुंगात आहे. पण अभिनेत्रीच्या आत्महत्येमुळे अभिनेते मुकेश खन्ना मात्र पुन्हा संतापले आहेत. त्यांनी थेट इंडस्ट्रीलाच प्रश्न विचारला आहे की, इतक्या कलाकारांच्या आत्महत्येनंतर असं पुन्हा घडू नये म्हणून काही विचार केला आहे का तुम्ही?
मुकेश खन्ना यांनी आपल्या लेटेस्ट युट्युब व्हिडीओमध्ये इंडस्ट्रीत एकापाठोपाठ होत असलेल्या कलाकारांच्या आत्महत्ये संदर्भात तीव्र संताप व्यक्त करत भाष्य केलं आहे. अभिनय क्षेत्रात अनेक वर्षांपासून कलाकारांच्या आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे असं ते थेट बोलले आहेत. ग्लॅमर जगताचा खरा चेहरा वेगळाच आहे असं देखील ते म्हणाले आहेत. कोणी काम मिळत नाही म्हणून चिंतेत आहे तर कोणी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे डीप्रेशनमध्ये आहे. मुकेश खन्ना यांनी वैशाली ठक्करच्या आत्महत्येवर हैराण होत म्हटलं आहे की, कसं एका हसत्या-खेळत्या चेहऱ्यानं आपलं आयुष्य संपवलं.
मुकेश खन्ना म्हणाले,''इंडस्ट्रीत खूप जणं आहेत जे खूप संवेदनशील असतात. २९ वर्ष हे काय वय आहे आयुष्य संपवण्याचं. वैशालीनं अजून आयुष्य नीट सुरू देखील केलं नव्हतं. एवढं सुंदर आयुष्य देवानं दिलं आहे. केवळ भावनिक रित्या ती कोसळून गेली आणि तिनं पंख्याला लटकून गळफास घेतला. वैशाली सेटवर सगळ्यांशी इतकं हसून-खेळून वावरायची ती कसं आपलं आयुष्य संपवू शकते. प्रत्येक माणूस जो वैशालीला ओळखायचा तो म्हणत असेल किती आनंदी असायची ही मुलगी,ही असं कसं करू शकते?''
''इंडस्ट्रीत गेल्या ३ वर्षात अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर काही दिवस त्याची चर्चा होते, लोक राग-संताप व्यक्त करतात,दुःख व्यक्त करतात. पण पुढे काय? माझी तक्रार आहे याविषयी. आपण इंडस्ट्रीत हे जे काही सुरू आहे ते थांबवण्यासाठी काही करणार आहोत का? कोणी तसा प्रयत्न देखील केला आहे का? आत्महत्या होतच राहतील पण मला प्रश्न पडतो की आपण काहीच त्यावर करत नाही आहोत''.
मुकेश खन्ना यांनी इंडस्ट्रीतील या आत्महत्या कशा थांबतील यावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले,''यासंदर्भात काम करणारी एक संस्था स्थापन करायला हवी. जिथे मानसोपचार तज्ञ नियुक्त करण्यात आले पाहिजेत. जेणेकरुन कोणीही कलाकार जो डीप्रेशनचा सामना करत आहे किंवा एकटेपणाचा सामना करत आहे तो तिथे जाऊन मोफत उपचार करुन घेऊ शकतो. आपल्या मनातलं बोलू शकतो. डॉक्टरांशी यासंदर्भात तुम्ही चर्चा करुन सगळं ठरवायला हवं. १-२ तासाची डॉक्टरसोबत केलेली चर्चा कदाचित आत्महत्या थांबवू शकतील. इंडस्ट्रीला याविषयी लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यायला हवा''.