अभिनेत्री मनवा नाईक साकारणार ऐतिहासिक भूमिका

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: September 19, 2022 13:16 PM
views 309  views

मराठी चित्रपट सृष्टीमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री मनवा नाईक(manava naik). अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशा भूमिका साकारत अभिनेत्री मनवा नाईक हिने आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ‘शिवप्रताप गरुड़झेप’(shivpratap garudjhep) या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका ती यात साकारणार आहे. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. 5 ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आग्रा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युक्ती, साहस व दूरदृष्टी यांच्या जोरावर महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यातून बसून स्वतःची व राजपुत्र संभाजीची नजरकैदेतून सुटका करून घेतली. आग्रा येथून यशस्वीपणे निसटून दख्खनमध्ये रायगड येथे येण्यात महाराजांनी यश मिळविले. शिवचरित्रातील ही तेजस्वी यशोगाथा शिवप्रताप गरुड़झेप या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.