सावंतवाडी : भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके, दादा कोंडके यांच्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्ण दिवस दाखविण्याचे काम केलं ते म्हणजे महेश कोठारे, सचिन पिळगावकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. मराठी माणसाची पावलं थिएटरकडे वळवणारी ही दिग्गज मंडळी. यातील अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा -२' सिनेमा तब्बल १९ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर या सिनेमान तुफान कल्ला केला आहे. डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर हसू, डोक्यात मती अन् गलिच्छ राजकारणाला मुठमाती देणारी अफलातून कलाकृती त्यांनी निर्माण केली आहे. ९० च्या दशकातील चित्रपटांच्या धर्तीवर पण, बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.
अशी ही बनवा बनवी,आमच्यासारखे आम्हीच, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या अभिनयाच्या केमिस्ट्री या सिनेमातून बघायला मिळाली होती. नवरा माझा नवसाचा मध्ये देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा बाबु कालीयाचा रोल होता. परंतु, त्यांना यात अभिनय करता आला नाही. याच दरम्यान महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या लक्ष्यानं मराठी सिनेसृष्टीसह जगाला कायमचा अलविदा केला. नवरा माझा नवसाचा-२ मध्येही अशोक सराफ व सचिन-सुप्रियाची केमिस्ट्री बघताना लक्ष्याची आठवण आवर्जून येते. १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी तेव्हाही डोक्यावर घेतलं होत. आताही तसाच प्रतिसाद नवरा माझा नवसाचा-२ ला मिळत आहे. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली असून तिनं दिवसांत तब्बल साडेचार कोटींची कमाई केली आहे.या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. नवरा माझा नवसाचा प्रमाणेच नवरा माझा नवसाचा-२ मध्येही एका नवसाची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा हा प्रवास एसटीमधून नाही तर तो प्रवास कोकण रेल्वेमधून आहे. सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, सुप्रिया, निर्मिती सावंत यांच्यासारखे सुपरस्टार, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासारखा दिग्गज नट तसेच विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, जयवंत वाडकर, हेमल इंगळे आदी कलाकारही चित्रपटात आहेत. गायक सोनू निगम आणि कॉमेडियन जॉनी लिवर, श्रिया पिळगावकर हे देखील पडद्यावर झळकले आहेत. यासह मागील चित्रपटातील दिवंगत रीमा लागू, सतिश तारे,प्रदीप पटवर्धन, कुलदीप पवार या कलाकारांचीही उणिव भासत आहे. या कलाकारांना अनोखी आदरांजली सिनेमातून दिली गेलीय.
मुकूट घालीन 50 खोक्यांचा...!
यासगळ्यामध्ये सिद्धार्थ जाधवने राजकीय नेता म्हणून जे भारुड या सिनेमात सादर केलं आहे त्याने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारं भारुड असून सोशल मीडियावर याची बरीच चर्चा सुरु आहे. या भारुडामध्ये सिद्धार्थने राजकीय नेता म्हणून गणपती बाप्पाकडे नवस केला आहे. यात, देवा तू मला नवसाला पावला...,सत्ताधारी खासदारकी लाभली मला..., मुकुट घालीन 50 खोक्यांचा तुला...तेव्हा स्वप्नील जोशी यांचा हे नवस बोलतायत की लाच देतायत असा संवाद आहे तर अशोक सराफ म्हणतात की, दुनियेत जसं चालतं तसंच साहेब बोलतात. अशा खुमासदार शैलीत भारूड सादर करत पक्षफुटी, महाराष्ट्रातील राजकारणावर आसूड ओढले आहेत.
सिनेमातून कोकण दर्शन...!
मागील चित्रपटाप्रमाणे यातही रत्नागिरीतील गणपतीपुळे अन् पुळ्याचा गणपती हे मुख्य आहेत. निर्वस्त्र होऊन नवस हाच धागा आहे. यावेळी मात्र दहा मिनिटं चारचौघांत निर्वस्त्र होण्याचा नवस आहे. नवस फेडण्यासाठी जाताना कोकण रेल्वेतून प्रवास दाखवला आहे. कोकणी माणूस, मालवणी, संगमेश्वरी भाषेचा साज चढविला आहे. कोकणातील दशावतार, बाल्या नृत्य यांचाही समावेश केला गेला आहे. कोकणचा निसर्ग अन् हिरव्यागार कोंकणातून धावणारी कोकणकन्या विशेष आहे. बालगणेशाच्या मुर्तीवर या सिनेमाची पूर्ण स्टोरी आहे. कोकणातील काही शिव्यांचाही अनूभव कानांना तृप्त करणारा असून सिनेमाचा शेवट फार रंजक आहे. चार चौघात निर्वस्त्र होऊन अभिनेता स्वप्नील जोशी आपला नवस फेडतो. हा सीन अन् नवस फेडतानाचा तो क्षण गेली ६० वर्ष हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीत योगदान देणाऱ्या सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनाला सलाम करून जातो.