LIVE UPDATES

Crime News : संशयितांच्या अटकेच्या मागणीसाठी उपोषण

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 12, 2026 20:19 PM
views 23  views

कणकवली : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व खोट्या कागदपत्रांच्या आधारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पीडितांनी सोमवारी कणकवली पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी उपोषणस्थळी भेट देत पीडितांना पाठिंबा दर्शविला. पोलिसांच्या आश्वासनानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपोषण स्थगित करण्यात आले.

या प्रकरणातील फिर्यादी सुनील दामोदर धुरे (रा. कलमठ, गावडेवाडी) यांच्या तक्रारीनुसार, शासकीय नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली. यातून १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मुलांच्या भविष्याच्या आशेने पीडितांनी कष्टाने जमवलेली पुंजी दिली होती. फसवणूक उघड झाल्यानंतर अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.

या प्रकरणातील संशयित आरोपी विनीता विवेक मुंज आणि सुबत्ता गिरीश माळी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग-ओरोस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी फेटाळले. पुढील तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

तरीही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याचा आरोप पीडितांनी केला. यावेळी सुशांत नाईक यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत पीडितांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी सुनील धुरे, संतोष मस्के, प्रताप दळवी आणि मनीषा नाईक उपस्थित होते.