LIVE UPDATES

शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात संपन्न

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 12, 2026 20:23 PM
views 23  views

देवगड : देवगड तालुक्यातील शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राजेंद्र हिंदळेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन श्री. हिंदळेकर यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, व्याख्याते राजेंद्र हिंदळेकर आणि पर्यवेक्षिका निशा दहिबावकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजेंद्र हिंदळेकर यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा प्राप्त झाला, त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले, याविषयी सविस्तर माहिती दिली. मराठी भाषेतील विविध गमतीजमती आणि तिचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप उलगडून सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेची ओळख करून दिली. तसेच मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे, मराठी साहित्याचे वाचन करणे आणि भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.

मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध साहित्यपरंपरा आणि भाषेचे महत्त्व यांविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळाल्याने कार्यक्रमातून मराठी भाषेविषयी अभिमानाची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर कुंभरे यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.