‘चिन्‍ह’ मिळण्‍याची ‘चिन्‍हे’ दिसेनात!

‘शिवसेना कुणाची’ निकाल पडला लांबणीवर....
Edited by: लाडोजी परब
Published on: October 08, 2025 20:29 PM
views 376  views

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार होती. मात्र आजची ही सुनावणी १ महिना पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार आहे.

न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीसाठी येणार होता. परंतु सशस्त्र दलाच्या महत्त्वाच्या सुनावणीमुळे न्या. सूर्यकांत यांना आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुरेसा वेळ मिळणार नव्हता. त्यामुळे आज न्यायाधीशांसमोर उद्धव ठाकरे यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा हवाला देत नजीकची तारीख देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून डिसेंबरमधील तारीख देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही बाजूचे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी १२ नोव्हेंबरची तारीख दिली. या खटल्यावर १२ नोव्हेंबरला सुनावणी करूया असं कोर्टाने म्हटलं.

आजच्या सुनावणीत कोर्टाने कपिल सिब्बल यांना अंतिम युक्तिवाद करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागेल असं विचारले असता मला ४५ मिनिटे पुरेशी आहेत असं सिब्बल यांनी उत्तर दिले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी होऊन निकाल हाती लागेल असं अपेक्षित होते परंतु सशस्त्र दलाशी निगडीत महत्त्वाचा खटला कोर्टासमोर आहे. यावर सविस्तर सुनावणी कोर्ट घेणार आहे. त्यामुळे शिवसेनेची संबंधित याचिका पुढे ढकलण्यात आली आहे.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल कोर्टात बाजू मांडत आहेत. आज कोर्टासमोर सिब्बल म्हणाले की, साधारणपणे जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील. त्यापूर्वी आम्हाला सुनावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोर्टाकडून शक्य तितक्या लवकरची तारीख द्यावी, जेणेकरून अंतिम युक्तिवाद पूर्ण होईल अशी मागणी केली. तर एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून ही तारीख आणखी लांबवण्याचा प्रयत्न केला गेला.

न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट द्यावा असा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.