
सिंधुदुर्गनगरी : रुग्णांच्या जीवासाठी धावणारी १०८ रुग्णवाहिका स्वतःच रस्त्यावर कोलमडली आणि क्षणभरासाठी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकला. वेंगुर्ला येथील १०८ रुग्णवाहिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण सोडून परत वेंगुर्ल्याकडे जात असताना जिजामाता चौकात अचानक मागील दोन्ही चाके निखळून पडली. सायंकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास हा जीवघेणा आणि धक्कादायक प्रकार घडला.
सुदैवाने त्या वेळी रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता. मात्र चालक आणि डॉक्टर वाहनातच होते. क्षणभरासाठी मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. रुग्ण नसल्याने मोठी जीवितहानी टळली; परंतु हा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ही १०८ सेवा भारत विकास ग्रुप कंपनीमार्फत दिली जाते. वाहनांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती केली जाते की नाही, असा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. रुग्णवाहिका म्हणजे जीव वाचवण्याचे साधन, परंतु अशा प्रकारे चाके निखळणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
जर त्या वेळी गंभीर अवस्थेतील रुग्ण वाहनात असता, तर काय अनर्थ घडला असता, याची कल्पनाही करवत नाही. रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने तातडीने लक्ष घालून सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
जीव वाचवण्यासाठी धावणारी रुग्णवाहिका रस्त्यावर थांबली, हा प्रकारच संपूर्ण यंत्रणेसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
यापूर्वीही धावत्या रुग्णवाहिकेने पेट घेण्याचा प्रकार घडला होता.











