नवी दिल्ली : लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी कथितरीत्या लाच घेतल्याच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या संसदेच्या नैतिकता समितीने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. समतीचा अहवाल ६ विरुद्ध ४ मतांनी स्वीकारण्यात आला असून आज, शुक्रवारी तो लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. बिर्ला त्यांच्या अधिकारात पुढील कारवाईबाबत निर्णय घेतील, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी दिली.
गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये समितीच्या १५ सदस्यांपैकी १० जण उपस्थित होते. भाजपच्या ७ पैकी ४ सदस्यांचा यात समावेश होता. विरोधी पक्षांपैकी काँग्रेसचे उत्तम कुमार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तेलंगणात गेले असल्यामुळे अनुपस्थित होते. काँग्रेसच्या खासदार व कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी प्रणित कौर यांनी अहवाल स्वीकारण्याच्या बाजूने मत दिले. मोईत्रांची सुनावणी निष्पक्ष झाली नसून प्रतिज्ञापत्र सादर करणारे दुबईस्थित उद्योजक दर्शन हिरानंदानी यांनाही चौकशीसाठी पाचारण करायला हवे होते, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
या सदस्यांचे आक्षेप निवेदन अहवालाबरोबर जोडण्यात आले आहे. हा अहवाल आज, शुक्रवारी लोकसभाध्यक्षांना सादर झाल्यानंतर मोईत्रा यांचा बडतर्फ करण्याचा प्रस्ताव लोकसभेत आणला जाऊ शकतो. बहुमताच्या आधारे हा प्रस्ताव संमत झाला तर मोईत्रा यांची खासदारकी रद्द होईल. मात्र, त्यांच्या विरोधातील लाचखोरीच्या आरोपांच्या चौकशीसाठी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवावा लागेल. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश लोकपालांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, लाच घेतल्याचा कुठलाही पुरावा समिती वा लोकपालांना मिळाला नसल्याचा दावा मोईत्रा यांनी केला आहे.