स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल : डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 10, 2026 11:26 AM
views 20  views

कणकवली : स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल. स्त्री ही मानवी समाजाची खरी उद्धारक आहे. याकरिता आजच्या मुलींनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज आहे. विशेषत: पालक वर्गाने आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे सजगपणे पहायला हवे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. राजश्री साळुंखे यांनी कणकवली कॉलेजमध्ये महिला दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलताना केले.

यावेळी मंचावर कणकवली महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, कणकवलीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शमिता बीरमोळे, ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.महादेव माने, लायन्स क्लब कणकवलीचे सचिव प्रा. दिवाकर मुरकर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुषमा हरकुळकर, महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. विद्या मारकड आदी उपस्थित होते. 

डॉ. साळुंखे पुढे म्हणाल्या, आजच्या स्त्रियांनी आपल्या इतिहासातील स्त्रियांचा आदर्श घ्यायला हवा. सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांच्या समान सर्व आदर्श स्त्रियांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करायला हवा. 

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, स्त्रीला जोपर्यंत समाज 'माणूस' म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत तिला तिचे खरे अस्तित्व मिळणार नाही. आज विकासाच्या सर्व क्षेत्रात स्त्रियांनी भरारी घेतली आहे, परंतु ही सार्वत्रिकता होण्याची गरज आहे. जागतिक महिला दिन सुरू होऊन आज 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 51 वर्षांत महिला वर्गाने निश्चित रूपाने प्रगती केली आहे. परंतु अलीकडे शिक्षित महिला अंधश्रद्धांच्या आहारी जात आहेत, हे चित्रही समाधानकारक नाही. स्त्रियांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात चिकित्सक विचार स्वीकारायला हवा. 

डॉ. शमिता बिरमोळे  यांनी स्त्रियांच्या आरोग्य सक्षमीकरणाविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शिका सुषमा हरकुळकर यांनी आजच्या महिलांनी स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्या आदर्शांची निश्चिती करायला हवी, असे सांगितले. प्रा. महादेव माने यांनी, महिला वर्गाने आपले अस्तित्व जागवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे सांगितले.

महिला दिनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांच्या करिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम क्रमांक प्रा. दुर्गा भुजबळ, द्वितीय क्रमांक प्रा. पूजा मुंज, तृतीय क्रमांक प्रा. गीतांजली सापळे यांना देण्यात आले व विभागून प्रा. सिटी जाधव, प्रा. वृषाली पाटील, प्रा.अर्निता चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते  प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विद्या मारकड, सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी सावंत व आभार प्रा. स्वीटी जाधव यांनी मानले. हा महिला दिनाचा कार्यक्रम कणकवली कॉलेजचा महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महिला दिनाच्या निमित्ताने कणकवली कॉलेजच्या महिला कर्मचार्‍यांच्या करिता विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कणकवली कॉलेजच्या महिला कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.