भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.