
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथे वाघाच्या हल्ल्याची गंभीर घटना घडली असून कृष्णा चंद्रकांत दळवी यांच्या तीन वर्षांच्या गायीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गुरांना चरण्यासाठी शेताजवळ नेले असता अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला केला. यावेळी घटनास्थळी गुराखी उपस्थित होता. वाघाचा हल्ला होताच गुराख्याने आरडाओरड केली असता वाघ तेथून पळून गेला. मात्र वाघाने गायीच्या मागील भागाचा जबडा काढल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, अशीच घटना तीन दिवसांपूर्वी मुळस हेवाळे येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. गोठ्यात बांधलेल्या रेड्याला वाघाने हल्ला केल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला होता. तसेच गेल्या महिनाभरातही वाघाच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असून वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत असल्याचे चित्र आहे.
सतत होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी हैराण झाले असून आपली जनावरे आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली आहे.










