राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा; मोदी आडनावाबद्दल 'ते' वक्तव्य भोवलं

लगेच जामीनही मंजूर
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 23, 2023 12:27 PM
views 189  views

ब्युरो न्युज : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दलची आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत असून राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुणावली आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. राहुल गांधी यांनी 'मोदी आडनाव'वरून वादग्रस्त विधान केले होते, याच प्रकरणात सुरत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावर भाष्य करताना मोदी हे सर्व चोरांचे नाव आहे का? असे विधान केले होते. यावरुनच मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची शिक्षाही स्थगित केली आहे.

13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का?" असे विधान केले होते. याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता.

यापूर्वी 17 मार्च रोजी या प्रकरणातील सर्व युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणात तात्काळ राहुल गांधींना जामीन  मंजूर झाला आहे. सुरत कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.