गॅस सिलिंडरची टंचाई | कुडाळमध्ये उबाठा शिवसेना आक्रमक

वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर 'सिलिंडर मोर्चा'
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 13, 2026 15:23 PM
views 46  views

कुडाळ : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट गृहिणींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. देशभरात सुरू असलेल्या एलपीजी गॅस टंचाईचे सावट सिंधुदुर्गातही गडद झाले असून, या प्रश्नावरून आज कुडाळमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी डोक्यावर रिकामे सिलिंडर घेऊन तहसीलदार कार्यालयावर धडक दिली आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य ग्राहक संकटात

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत, तर घरगुती सिलिंडरसाठी वितरक केंद्रांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ऑनलाइन बुकिंग करताना ओटीपी (OTP) प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने सामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत.

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. "देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पण मिळत नाहीत गॅस सिलिंडर" अशा उपरोधिक घोषणांनी कुडाळ शहर परिसर दणाणून गेला होता. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, "गॅस बुकिंगच्या ऑनलाइन प्रणालीत तातडीने सुधारणा करून ऑफलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरळीत करून हॉटेल व्यावसायिकांना दिलासा द्यावा. येत्या दोन दिवसांत जर सकारात्मक कार्यवाही झाली नाही, तर मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल."

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जि.प. सदस्य रुपेश पावसकर व गंगाराम सडवेलकर, बाळा कोरगावकर, मंदार शिरसाट, अतुल बंगे, राजू कविटकर, दिपश्री नेरूरकर, संतोष शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.