सिंधुदुर्गच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर विधान परिषदेत लक्षवेधी

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे गंभीर आरोप
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 13, 2026 14:22 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय कामात अत्यंत दिरंगाई होत असून कोणत्याही कामासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचने दरम्यान केला. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. 

विधान परिषदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून एका लक्षवेधी दरम्यान आमदार न्यानेश्वर म्हात्रे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करीत सभागृहाचे लक्ष वेधले. माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक व शिक्षकेतर यांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत. अनेक बिले प्रलंबित राहिली आहेत. कोणत्याही कामासाठी पैशांची मागणी केली जाते. शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, अल्पसंख्यांक शाळा तील शिक्षक मान्यता प्रस्ताव, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, वैद्यकीय बिलांची मान्यता प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबित असल्याची तक्रार जिल्ह्यातील विविध संघटनांनी आपल्याकडे केली आहे. कार्यालयातील कर्मचारी त्याठिकाणी काम करायला तयार नाहीत. एजंट द्वारे फाइल तपासून पैसे घेतले जातात. तर अनुकंपा शिपाई भरती मध्ये एका विधवा महिले कडे पैशाची मागणी झाली. तिने अखेर मंगळसूत्र विकून पैसे दिले असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. आर्थिक आरोपांबाबत पुरावे आल्याचेही स्पष्ट केले. 

याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांची तक्रार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी तक्रार केली आहे आपण स्वतः याबाबत तक्रार केली आहे. मग त्यांना कोण पाठीशी घालतंय ? असा सवाल ही म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. 

या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले असून दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असे सभागृहात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता  सीईओ यांच्या चौकशी अहवालाकडे सिंधुदुर्गसह राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. या गंभीर आरोपा मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.  मागील अनेक दिवस या शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. तर आता आणखीन काही तक्रारी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  माध्यमिक शिक्षण विभागाचे विधान परिषदेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अक्षरशः वाभाडे काढले.त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागावर मुख्य कार्यकारी अधिकारी आता काय कारवाई करतात? आणि काय भूमिका घेतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.