
कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित "जागर स्त्री शक्तीचा" हा कार्यक्रम सोमवारी ९ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. महिलांचा सन्मान आणि त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या सोहळ्याला जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात महिला ढोलताशा पथकाच्या दमदार वादनाने झाली. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी सादर केलेल्या ढोलताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिलांच्या या ऊर्जेने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमात एक वेगळीच रंगत भरली. दिवसभर आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामध्ये पाककला, उखाणे आणि 'खेळ पैठणीचा' यांसारख्या स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरल्या.
खेळ पैठणीचा: या विशेष स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुंदर पैठणी, द्वितीय सोन्याची नथ तर तृतीय चांदीचा करंडा देण्यात आला. पाककला स्पर्धा: विजेत्यांना ७ पीस कुकिंग जॉय सेट, कढई सेट आणि पॅन सेट देऊन गौरविण्यात आले. उखाणा स्पर्धा: यामध्ये चांदीचा छल्ला, चांदीची पैजण आणि जोडवी अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. लकी ड्रॉ: भाग्यवान १० विजेत्यांना मिक्सर, फॅन, कुकर आणि केटल यांसारख्या उपयुक्त वस्तू देण्यात आल्या. तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला 'सौभाग्य वाण' देऊन सन्मानित करण्यात आले.
केवळ खेळच नव्हे, तर समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या यशस्वी महिला व युवतींचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, अस्मिता बांदेकर, नीता राणे, रूपेश कानडे, नागेश आईर, वैशाली पावसकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या सामर्थ्याचा जागर करणाऱ्या या सोहळ्याने कुडाळवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा दिवस सहभागी सर्व महिलांसाठी अविस्मरणीय ठरला.










