मोपा विमानतळाचं 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

5 जानेवारीपासून व्यावसायिक आणि देशांतर्गत विमानांची सुरू होणार वाहतूक
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 10, 2022 15:58 PM
views 633  views

पेडणे : मोपा आंतरराष्ट्रीय ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या दिवशी उड्डाणे न होता ५ जानेवारी २०२३ पासून विमानतळावर व्यावसायिक आणि देशांतर्गत विमानांची वाहतूक सुरू होणार आहे.      

मोपा विमानतळ हा प्रकल्प पेडणेच नव्हे तर उत्तर गोव्यासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामधून सरकारला तब्बल ३६ टक्के महसूल प्राप्त होणार आहे. या राष्ट्रीय प्रकल्पासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. काही शेतकरी समाधानी, तर काही नाराज आहेत. मोबदला न मिळालेले शेतकरी सरकारवर दोषारोप करत आहेत. 

विमानतळावर विविध सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. सर्वत्र आपत्कालीन स्थितीत उपयोगी पडणारी अग्निशमन यंत्रणा पूर्ण झाली आहे. पॅसेंजर टर्मिनल इमारत, एअर ट्रॅफिक टॉवर आणि सर्वांवर नियंत्रण ठेवणारी इमारतही सज्ज झाली आहे. विमान उड्डाणासाठी लागणारे ‘रन वे’ तयार आहेत. ते ६० मीटर रुंद आणि साडेतीन किलोमीटर लांब आहेत. विमानापासून विमानतळावर प्रवाशांना आणण्यासाठी समांतर टॅक्सी रन वे तयार आहेत. विमाने उभी करण्यासाठी जागा तयार आहे. थेट विमानात येण्या-जाण्यासाठी पॅसेंजर ब्रिज तयार आहेत. विमानतळ उड्डाण आणि उतरवण्यासाठी आवश्यक साधनसुविधा पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती जीएमआर कंपनीकडून देण्यात आली आहे.      

विमानतळ इमारतीला राज्यातील कला, संस्कृतीची ओळख सांगणारी रंगरंगोटी करण्यात आली आहे. पॅसेंजर विश्रांती घेणार तेथे मोठी स्क्रीन लावली आहे. स्क्रीनवर प्रवाशांना गोव्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती दिली जाणार आहे. बाहेर अंगणात आकर्षक कारंजे बसवण्यात आले आहेत.

लिंक रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू 

मोपा विमानतळाकडे जाण्यासाठी लिंक रस्ता अद्याप अपूर्ण स्थितीत आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धारगळ सुकेकुळण ते मोपा विमानतळ प्रकल्पाकडे जाणारा लिंक उड्डाण पूल रस्ता १२०० कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. त्या रस्त्याला राष्ट्रीय हमरस्ता म्हणून मान्यता मिळाली आहे.