
कुडाळ : घावनळे येथील 'दिक्षा तीमाझी बागवे' खून प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी व्हावी, यासाठी किशोर वरक यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केलेल्या अर्जाला आयोगाने प्रतिसाद दिला आहे.
या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने, आयोगाच्या श्रीमती सुनिता गणगे (समुपदेशक) यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ कलम १२ (२) व (३) नुसार कार्यवाही करत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित घटनेच्या वस्तुस्थितीचा अहवाल पाच दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
किशोर वरक यांनी आपल्या पत्रात दीक्षा बागवे खून प्रकरणामध्ये पोलिसांकडून निष्काळजीपणा व दिरंगाई झाल्याचा आरोप केला होता. या अर्जाची दखल घेत राज्य महिला आयोगाने या खून प्रकरणातील तक्रारीची शहनिशा करण्यासाठी हा अहवाल तातडीने मागवला आहे. आयोगाच्या या भूमिकेमुळे या खून प्रकरणाला वेगळी दिशा मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










