
सावंतवाडी : आर्थिक देवाण घेवाणच्या बदल्यात कारचा ताबा घेण्यासाठी सावंतवाडीत आलेल्या व त्यावरून फिल्मी स्टाईल मारामारी केल्याप्रकरणीच्या विविध गुन्ह्यात फरार असलेल्या तला राजगुरू व अन्य अशा दोघांच्या शोधासाठी सावंतवाडी पोलिसांची पथके गोव्यात रवाना झालीत. पोलिस निरीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
येथील सागर कारिवडेकर यांना पुण्यातील शंभूराज देवकाते यांनी रक्कम गुंतवणुकीसाठी दिली होती. ही रक्कम वारंवार मागूनही न मिळाल्यामुळे त्या बदल्यात कारिवडेकर यांनी आपली आलिशान पोर्शे कार ताब्यात देण्याचे आश्वासन दिले होते. त्या कारची चावी देखील देवकाते यांना पोहोच झाली. त्यामुळे सावंतवाडी येथील सर्वोदयनगर येथील बंगल्यात पार्क असलेली ती कार नेण्यासाठी पुणे येथील देवकाते व अन्य चार जण सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी कारिवडेकर यांचा सुपरवायझर नितीन मेस्त्री याने कार ताब्यात देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान आम्ही ती कार व आर सी बुक नेण्यासाठी आलो आहोत असे संशयित यांनी सांगत त्याला मारहाण केली होती. रविवारी मध्यरात्री पर्यंत हे प्रकरण वाढत गेले. त्यानंतर सुपरवायझर मेस्त्री यांनी काही जाणंना बोलावून घेतले. त्या पाच जणांनी देवकाते व त्यांच्या इसमांवर अंगावर गाडी घालणे रॉडने मारणे दगडफेक करणे असे प्रकार केले. या सर्व घटनेत पुण्यातील शौनक सकपाळ हे देखील जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी तातडीने बांदा व कुडाळ येथे नाकाबंदी करत पुणे येथील पाच व सावंतवाडीतील चार अशा एकूण नऊ जणांना अटक केली होती. तर यातील एक कार मधून तला राजगुरू व अन्य एक अनोळखी इसम पळून जाण्यात यशस्वी झाले. अटकेतील नऊ ही जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. फरार असलेल्या दोघांच्या शोधसाठी पोलीस पथके गोव्यात रवाना झालीत त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल. या गुन्ह्यातील ती कार ही जप्त करायची आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलीय.










