महिलांचे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणारा दिवाळी फराळ प्रशिक्षण उपक्रम

Edited by: संदीप देसाई
Published on: October 08, 2025 17:09 PM
views 275  views

बेळगाव : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री प्रभू विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्था, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एस. पी. एम. रोडवरील विश्वकर्मा मनु-मय संस्थेच्या सभागृहात दिवाळी फराळ प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये विश्वकर्मा संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सुतार, सेक्रेटरी किशोर कणबरकर, डायरेक्टर महादेव तोंडकर, विनायक देसाई, रंजना मोदगेकर (महिला मंडळ उपाध्यक्षा), सुनीता सुभेदार (सुवर्ण कर्नाटक मानव अधिकार जिल्हाध्यक्ष), प्रदीप सुतार, प्रसन्ना लोहार, धर्मा लोहार तसेच प्रशिक्षक अर्चना व उज्वला पाटील यांचा समावेश होता.

या प्रशिक्षणामध्ये महिलांना ११ प्रकारच्या पारंपरिक दिवाळी फराळाच्या पदार्थांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. एकूण २७ महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थींनी मनोगतातून या उपक्रमामुळे त्यांना आत्मविश्वास व प्रेरणा मिळाल्याचे व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विश्वकर्मा संघाचे अध्यक्ष भरत शिरोळकर यांनी “बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रशिक्षणांचे आयोजन व्हावे,” अशी भावना व्यक्त केली. तसेच महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा यासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

कोकण संस्थेच्या श्रीदेवी दंडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत “महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी हे एक प्रभावी पाऊल आहे; सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन केले.