सावंतवाडी शहरात डास निर्मूलनाची धडक मोहीम

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 02, 2026 12:09 PM
views 12  views

सावंतवाडी : शहरात राबवण्यात आलेल्या 'महास्वच्छता अभियाना'ला यश मिळत असतानाच, आता प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहरात डास निर्मूलनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त होते. डास निर्मूलनासाठी फवारणी आणि फॉगिंग करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. 

ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपने शहरवासीयांना दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी तात्काळ पावले उचलत संपूर्ण शहरात धूर फवारणी सुरू केली आहे. ज्या भागांमध्ये अस्वच्छता आहे किंवा जिथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे, अशा ठिकाणांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ही मोहीम केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न राहता, शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राबवण्यात येणार असल्याचे निरवडेकर यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. डास निर्मूलनासाठी आम्ही वचनबद्ध होतो आणि त्या दृष्टीने ही मोहीम आता सातत्याने सुरू राहील. शहरातील एकही कोपरा फवारणीविना राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत असे ॲड. निरवडेकर यांनी सांगितले.