
सिंधुदुर्गनगरी : रसिक आणि साहित्य यांना एकत्र आणण्याबरोबरच प्रस्थापितांप्रमाणे नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणारी, साहित्य आणि मराठीचा प्रसार करणारी 'आम्ही साहित्यप्रेमी'सारखी साहित्यिक व्यासपीठे गावोगावी निर्माण झाली पाहिजेत. 'घुंगुरकाठी' स्वयंसेवी संस्थेच्या या उपक्रमाचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा कवी निलेश गावकर (साळशी) यांनी ओरोस येथे नुकतीच व्यक्त केली. 'आम्ही साहित्यप्रेमी'च्या पहिल्या वर्धापनदिनाच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे यांचा सहभाग असलेली ही मैफल टाळ्यांचा कडकडाट, वाहवा, 'पुन्हा घ्या' याचा वारंवार उच्चार याने रंगली.
ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात 'काव्योत्सव' हा कविसंमेलनाचा कार्यक्रम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निलेश गावकर यांच्याबरोबरच कणकवली येथील कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे यांनाही या कार्यक्रमाला निमंत्रित कवी म्हणून बोलवण्यात आले होते. सुमारे दोन तास चाललेल्या आणि उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या कवींनी आपल्या आशयपूर्ण कवितांच्या प्रभावी सादरीकरणाने रसिकांची उत्स्फुर्त दाद आणि वाहवा मिळवली. या उपक्रमाचे प्रवर्तक आणि 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वर्षभरातील सर्व कार्यक्रमांचा आढावा घेतला. कवयित्री डॉ. सई लळीत यांनी निमंत्रितांचा परिचय करुन दिला. तिन्ही मान्यवरांचा सत्कार गुलाबपुष्प आणि ग्रंथभेट देऊन करण्यात आला. प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांना वंदन करण्यात आले.
गावकर म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही साहित्यप्रेमींच्या या अक्षरयज्ञात चार समिधा अर्पण करण्याची संधी मला मिळाली. गेली चार वर्षे काही लिहिण्याचा जो वेडा वाकडा प्रयत्न केला तो मंचावर सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे साहजिकच दडपण, भिती हुरहूर आणि उत्सुकता होतीच. पहिल्याच मंचीय सादरीकरणाबाबत माझी मलाच खात्री नव्हती. मात्र कार्यक्रम सुरु झाला आणि मैफल रंगत गेली. भिती, हुरहूर दूर झाली आणि वातावरण हलकेफुलके होत गेले. जाणकार रसिकांची दाद मिळत गेली. टाळ्या, वाहवा, 'पुन्हा घ्या' चा कैफ काय असतो तो अनुभवता आला.
शिक्षकी पेशात असलेल्या श्रीमती कल्पना मलये यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात साहित्यिक व्यासपीठ सुरु करणे आणि त्याचे सलग बारा कार्यक्रम वर्षभरात सादर करणे ही दिलासा देणारी बाब आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी भाषा कशी जगणार, अशा आशयाची चर्चा सगळेच करतात. पण छोट्या प्रमाणात का होईना, याबाबतची प्रत्यक्ष कृती करुन साहित्याचाबरोबरच मराठीचा प्रसार करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकार, लेखक, अभिनेता असलेला युवा कवी श्रेयश शिंदे यानेही या उपक्रमामुळे आपल्याला अनेक ज्येष्ठ कवी आणि जाणकार रसिकांची दाद मिळवता आली. या अनुभवामुळे मोठे प्रोत्साहन मिळाले, अशी भावना व्यक्त केली.
गावकर यांच्या 'निळा रंग गेला अता या नभाचा, दिसे सावळे रुप अनंतापरी' या पहिल्याच कवितेला उत्स्फुर्त दाद मिळाली. त्यानंतर 'होत तुलाही त्रास असावा, की माझा हा भास असावा', 'मी देवाला शोधाया चौफेर फिरोनी येतो, ना सापडला…गाभारी तक्रार करोनी येतो' या कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले. त्यांनी सादर केलेल्या एका गजलेतील 'तो एकटाच होता देहात प्राण असता, प्रेतास भेट द्याया कित्येक यार आले' या शेराने वाहवाची दाद मिळवली.
श्रीमती कल्पना मलये यांनी 'नदी वाहते' या कवितेतून 'नदीचा काठ जिथे फुललेला असतो, तिथे नदीची वाट अडवलेली असते' या ओळीतून आपली सजगता दाखवून दिली. 'पुरुष' या कवितेतील 'त्याच्या हसण्यामागे, सगळं काही सांगताना, तो खूप काही दडवतो, स्वतःच्या हसण्यामागे' या ओळी पुरुषांबद्दलच्या स्त्रीच्या भावना स्पष्ट झाल्या. 'आठवणींच कपाट' या कवितेतील 'किती निरागस असतात ना मुलं? त्यांना उगीचच वाटत राहतं, बाई तपासताना वापरतात म्हणजे बाईंना आवडत असावा लाल रंग' या ओळी रसिकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन गेल्या. 'कंदीलाची काच' आणि त्यातील 'कातर वेळेला कंदीलाची काच पुसताना आई हळवी व्हायची' या ओळीने अनेकांचे डोळे पाणावले.
युवा कवी श्रेयश शिंदे या कविसंमेलनात भाव खाऊन गेला. 'एक कविता लिहीन म्हणतोय आभाळाला भिडेन म्हणतोय' ही त्याची पहिलीच कविता रसिकांनी उचलून धरली. 'तू पहाट पावली वाजत पैंजण आली दारी, अन् तुला पाहता या चेहऱ्यावर आली लाली' (तुला पाहता), 'यदा कदाचित आला वारा वाहून जातील पाने, माना पडल्या पाचोळ्यातून उठेल जीवनगाणे' (यदा कदाचित), कुठल्यातरी गडद उन्हात तृप्तीचा देऊन ढेकर, मृत्यू हसतो शेतकऱ्याची खाऊन चतकोर भाकर (एवढंच काय ते), सांज कातर कातर, मन नितळ नितळ' (सांज) या कवितांना चांगली दाद मिळाली. 'शेबय शेबय बाय शेबय शेबय, शेबय शेबय बाय घाल गो शेबय' (शेबय) या कवितेतील एकाकी वृद्धाने मागितलेली दोन घडी सोबतीच्या शबयची मागणी आजच्या समाजातील दारुण स्थितीचे चित्र दाखवणारी ठरली.
या कविसंमेलनाला ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, उद्योजक संतोष कदम, लेखक पुरुषोत्तम लाडू कदम, ॲड. सुधीर गोठणकर, अभिनेते प्रमोद कोयंडे, स्वप्नील वेंगुर्लेकर, पी. एस. कौलापुरे, सौ. मेघना निलेश गावकर, विष्णुप्रसाद दळवी, सौ. आईना सत्यवान कदम, मधुकर जाधव, मनोहर सरमळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.










