
मुंबई : रेल्वेचा लांबपल्ल्याच्या प्रवास म्हटला की तिकीटांसाठी मोठमोठ्या रांगा आणि हातात पडणारी भलीमोठी प्रतिक्षा यादी…हे चित्र लवकरच बदलणार आहे. रेल्वेने आता आपल्या तिकीट तपासनीसांकडे हॅण्ड हेल्ड टर्मिनल मशिन सोपवल्याने चमत्कार होणार आहे. आता या हॅण्डहेल्ड मशिनमुळे रेल्वे तिकीटांची प्रतिक्षायादी संपण्यास मदतच होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व गाड्यांवर ही योजना लागू करण्यात आली आहे.
रेल्वे गाड्यांच्या तिकीटांना उन्हाळी सुट्या किंवा सणासुदीला खुपच मागणी असते. त्यामुळे तिकीटांची वेटींग लिस्ट खूपच मोठी असते. शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कन्फर्म होईल की याची प्रवाशांनी चिंता लागलेली असते. यावर उपाय म्हणून रेल्वेने आधुनिकतेचा मंत्र जपला आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या सर्वच्या सर्व ट्रेनच्या टीसींकडे हॅण्ड हेल्ड टर्मिनल मशिन सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेटींगची तिकीटे कन्फर्म होण्यासाठी सहाय्य मिळणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पंतप्रधानांचे डिजीटल इंडीया व्हीजनचे स्वप्न साकार करण्यास मदत मिळत आहे.
पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या सर्व 298 मेल-एक्सप्रेस ट्रेनमध्ये ट्यूडी बजावणाऱ्या तिकीटतपासनीसांकडे हैंड हेल्ड टर्मिनल ( HHT ) सोपविण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेसमध्ये कार्यरत एकूण 1385 तिकीट तपासनीसांना हे हैंड हेल्ड टर्मिनल मिळाले आहेत. त्यामुळे तिकीट तपासण्याचे आणि दंड आकारण्याचे काम डीजिटल होणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील तिकीट तपासण्याचे काम टीसी आता या हॅण्ड हेल्ड टर्मिनल मशिनद्वारे करणार आहेत.
एचएचटी मशिन हाती आल्याने टीसींना आरएसी आणि प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना रिकामी असलेली आसने वाटणे सोपे होणार आहे. या मशिन ऑनलाईन सर्व्हरशी कनेक्ट असल्याने सीट / बर्थची ऑक्यूपन्सीबाबत ताजी माहिती ऑनलाईन पाठवतील, त्यामुळे गाडीच्या आगामी स्थानकातून बुकींग करणाऱ्या प्रतिक्षा यादीतील प्रवाशांची तिकीटे कन्फर्म करणे सोपे होईल. एचएचटी मशिन्स जीपीआरएसद्वारे प्रवासी आरक्षण केंद्रांना ( पीआरएस ) रियल-टाइम माहिती पाठवतील, त्यामुळे पुढे येणाऱ्या स्थानकावरील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रिकामी आसने (बर्थ ) मंजूर करता येतील.
काही वेळा प्रवाशांची ट्रेन चुकते, किंवा काही प्रवासी चार्ट तयार होण्यापूर्वीच तिकीट रद्द करतात. अशावेळी ही रिकामी आसने अशा वेटींगच्या प्रवाशांना देण्याचे काम या मशिन्समुळे अधिक पारदर्शक पद्धतीने होईल. पूर्वी मॅन्युअली होणारे हे काम आता संगणकीय पद्धतीने होईल. या नव्या तंत्रामुळे कागदावर चार्ट छापण्याची पद्धत बंद होऊन सर्व कारभार पेपरलेस होण्यास मदत मिळणार आहे. 2018 मध्ये ऑगस्त क्रांती राजधानी एक्सप्रेसमध्ये पश्चिम रेल्वेनेच प्रथम टीसींच्या हाती टॅबलेटच्या रूपात एचएचटी मशिन दिल्या होत्या.














