नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी २१ मार्चला ईडीने अटक केली. यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी ईडीने तब्बल ९ वेळा समन्स बजावले होते. मात्र, अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सनंतरही चौकशीला हजर झाले नाही. यानंतर अखेर ईडीकडून केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली.