नवी दिल्ली : यूजीसी चेअरमॅनच्या मते, पुढल्या काही महिन्यांत अनेक पाठ्यपुस्तकांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचा विचार आहे. या राष्ट्रीय मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी अनेर प्रकाशकांनी उत्सुकता दाखवली याबद्दल त्यांनी कौतुकही केले आहे. यूजीसी ने रोड मॅप तयार करण्यासाठी आणि विविध भाषांमधील पाठ्यपुस्तके भारतीय भाषेत आणण्याच्या दिशेने एक सर्वोच्च समिती देखील स्थापन केली आहे.
भारतीय उच्च शिक्षण विशेषत: अंडर ग्रॅज्युएट सिलॅबसमध्ये हा एक मोठा राष्ट्रव्यापी बदल ठरणार आहे. तसेच यामुळे बीए. बीकॉम आणि बीएससीसारख्या अंडरग्रॅज्युएट पाठ्यपुस्तकांच्या भाषेला आता मर्यादा नसणार आहे.
विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत ग्रॅज्युएशन करू शकतील. त्यासाठी बीए, बीकॉम आणि बीएससी अभ्यासक्रमाची सगळीच पुस्तके बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तमिळ, तेलगु या सगळ्या भाषांमध्येही आणण्याचाही प्रयत्न असेल.
या भाषांमध्ये पाठ्यपुस्तकाच्या भाषांतराला सुरूवात
याशिवाय ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, ओरिएंट ब्लॅकस्वान आणि एल्सेव्हियरचे प्रतिनिधीही या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी झाले होते. यूजीसी, एनई पी २०२० चा एक भाग म्हणून, देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १२ भारतीय भाषांमध्ये पदवीपूर्व कार्यक्रमांसाठी सर्वात लोकप्रिय पाठ्यपुस्तकांची भाषांतरे आणण्याच्या दिशेने काम सुरू झाले आहे.
यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांनी माहिती दिली की यूजीसी एक नोडल एजन्सी म्हणून काम करेल जी प्रकाशकांना पाठ्यपुस्तकांची ओळख, भाषांतर साधने आणि संपादनासाठी तज्ञांना सर्व मदत आणि समर्थन प्रदान करेल जेणेकरून पाठ्यपुस्तके डिजिटल स्वरूपात परवडणाऱ्या दरात उपलब्ध करता येतील. यासाठी यूजीसी दोन ट्रॅकवर काम करत आहे. ज्यामध्ये बी. ए., बी. एस्सी., आणि बी. कॉम या कार्यक्रमांची सध्याची लोकप्रिय पाठ्यपुस्तके ओळखली जातील आणि भारतीय भाषांमध्ये अनुवादित केली जातील. यासोबतच, भारतीय लेखकांना गैर-तांत्रिक विषयांसाठी भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
६ ते १२ महिन्यांत अनेक पाठ्यपुस्तकांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचा यूजीसीचा मानस आहे. प्रकाशकांच्या प्रतिनिधींनी या राष्ट्रीय मिशनमध्ये भागीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय दिग्गजांव्यतिरिक्त, यूजीसी या विषयावर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय प्रकाशकांशी देखील सतत चर्चा करत आहे. यूजीसी ने अलीकडेच वायली इंडिया, स्प्रिंगर नेचर, टेलर आणि फ्रान्सिस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया, सेंगेज इंडिया आणि मॅकग्रॉ-हिल इंडियाच्या प्रतिनिधींशी भारतीय भाषांमध्ये पदवीपूर्व इंग्रजी पाठ्यपुस्तके आणण्याबाबत चर्चा केली आहे.
यूजीसी चेअरमनच्या म्हणण्यानुसार, प्रारंभिक लक्ष बी. ए., बी. एस्सी., आणि बी. कॉम प्रोग्राममधील विद्यमान पाठ्यपुस्तकांच्या भाषांतरावर असेल, जे नंतर पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये विस्तारित केले जाईल. यूजीसी विविध भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी भारतीय लेखक आणि शिक्षणतज्ज्ञांना प्रोत्साहन देईल आणि प्रकाशकांना ते प्रकाशित करण्यासाठी सहभागी करेल, अशी माहितीही देण्यात आली.