गोव्यात अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी 2019 पासून 690 छापे

21 प्रकरणांतील आरोपींना शिक्षा : 519 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 30, 2023 10:37 AM
views 219  views

पणजी : राज्यात २०१९ पासून अमलीपदार्थ तस्करी प्रकरणी ६९० छापे टाकण्यात आले आहेत. यातील २१ प्रकरणांतील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली, तर ४ प्रकरणांतील संशयितांना आरोपातून मुक्त केले. दोन प्रकरणांतील आरोपींना निर्दोष मुक्त केले, तर न्यायालयात ५१९ प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.

या प्रकरणी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी याविषयी विधानसभेत अतारांकित प्रश्न दाखल केला होता. त्यानुसार, राज्यात ड्रग्ज सेवन व तस्करी प्रकरणी २०१९ मध्ये २१९, २०२० मध्ये १४८, २०२१ मध्ये १२१, २०२२ मध्ये १५४ तर १ जानेवारी ते १३ मार्च २०२३ या कालावधीत ४८ गुन्हे मिळून ६९० गुन्हे दाखल केले आहे. वरील कालावधीत गोवा पोलिसांच्या विविध विभागाने ६९० गुन्हे नोंद केले आहेत. त्यातील ५४८ प्रकरणात देशी, तर १४२ गुन्ह्यात विदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यात ९० प्रकरणात नायजेरीयन, ४९ प्रकरणात रशियन, ८ नेपाळी व इतर देशांतील नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात २०१९ पासून ते १३ मार्च २०२३ च्या कालावधीत ६९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील २१ प्रकरणांतील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यात १७ प्रकरणातील देशी, तर २ प्रकरणात नेपाळी, प्रत्येकी एक दोन प्रकरणांतील रशियन आणि फ्रान्स नागरिकांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. याशिवाय ४ प्रकरणांतील संशयितांना आरोपातून मुक्त केले आहे. ६ प्रकरणांतील संशयितांचा मृत्यू झाल्यामुळे प्रकरणे बंद करण्यात आली. ६ प्रकरणांत पोलिसांनी न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. त्यामुळे ५१९ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. १३२ गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत.

जप्त केलेल्या ड्रग्जची विल्हेवाट

राज्यात २०१९ पासून ते १३ मार्च २०२३ च्या कालावधीत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जपैकी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील भट्टीत १० डिसेंबर २०१९ रोजी २८.५७ किलो ड्रग्ज, १८ मार्च २०२० रोजी २७ किलो ड्रग्ज, १२ ऑगस्ट २०२१ रोजी २९.५६८ किलो ड्रग्ज, तर कुंडई येथील बायोटीक वाॅटर सोल्युशन प्रा. लि. कंपनीच्या भट्टीत १६. ८५५ किलो ड्रग्ज विल्हेवाट लावण्यात आला आहे.