रवींद्र वायकरांना पोलिसांकडून क्लीन चिट !

Edited by: ब्युरो
Published on: July 06, 2024 09:54 AM
views 164  views

मुंबई : कथित भूखंड घोटाळा प्रकरणात शिंदेसेनेचे खासदार रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिली आहे. वायकरांविरोधात गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाल्याची अजब माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये दिली आहे. वायकर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत गेले. 


राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरेंचं निकटवर्तीय असलेल्या रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वायकरांवर केला होता.


आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनिषा, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. त्यांनी वायकरांना दिलासा दिला आहे. 'वायकरांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही. गैरसमजातून, चुकीच्या माहितीवरुन या प्रकरणात मुंबई महापालिकेनं त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला,' असा निष्कर्ष आर्थिक गुन्हे शाखेनं काढला आहे.