विकासाचं व्हिजन सांगणारे गायब झालेत‌ : संजू परब

सावंतवाडीतील परिस्थिती बदलली नाही तर रस्त्यावर उतरू
Edited by: विनायक गांवस
Published on: March 11, 2026 13:14 PM
views 37  views

सावंतवाडी : पाणी पुरवठा विभागाच्या नळपाणी योजनेच काम तज्ञ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरु नाही. याबाबत सभागृहात आम्ही आवाज उठवला. बांधकाम विभाग हे काम बघत आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विकासाच व्हिजन सांगणारे गायब झालेत‌. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही. शहर धुळ खात हे सत्ताधाऱ्यांच पाप आहे. येत्या आठ दिवसांत परिस्थिती बदलली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी दिला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. परब म्हणाले, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांना सोबत घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सुरू असलेल्या चुकीच्या कामाची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगू तसेच शहरात सुरू असणाऱ्या गॅस पाइपलाईनमुळे शहरवासीयांना धुळ खावी लागत आहे‌‌. जोपर्यंत टेंडर निघत नाही तोपर्यंत हे काम थांबवाव अशी आमची मागणी आहे. त्यामुळे शहरवासीयांना त्रास होणार नाही. हे काम न थांबवल्यास कोणी कुठे कुठे बैठका घेतल्या ? ते नावानिशी जाहीर करेन असा इशारा देखील श्री‌. परब यांनी दिला. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.