मुंबई : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.