
मुंबई : राज्याच्या महत्त्वाकांक्षी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विशेष कौतुक केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईच्या बहुविध वाहतूक व्यवस्थेला एक नवा आयाम मिळणार आहे. सुमारे 6 हजार 66 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये 33 जलमार्ग आणि 44 टर्मिनल्स उभारण्यात येणार आहेत.
सुमारे 340 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 203 इलेक्ट्रिक आणि हायब्रीड बोटींचा ताफा कार्यरत असेल. 2031 पर्यंत सुमारे साडेसात कोटी प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगातील कोणत्याही शहरापेक्षा सर्वात मोठी जलवाहतूक व्यवस्था मुंबईत उभी राहील. पर्यावरणपूरक, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत, हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.













