LIVE UPDATES

कुडाळ विकास आराखड्यात शासकीय जमिनी वगळून खाजगी जागांवर आरक्षणांचा जुलूम: राकेश कांदे

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 09, 2026 22:19 PM
views 39  views

कुडाळ : कुडाळ शहराच्या प्रारूप विकास योजनेत (DP) शासकीय मालकीच्या जमिनी जाणीवपूर्वक वगळून सर्वसामान्य नागरिकांच्या खाजगी जागा, पिढ्यानपिढ्यांची घरे आणि दुकानांवर अवाजवी आरक्षणे लादण्यात आली आहेत, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी केला आहे. या आराखड्याविरोधात त्यांनी प्रशासनाकडे विस्तृत हरकती व सूचनांचे निवेदन सादर केले आहे.

कांदे म्हणाले की, कुडाळवासीयांचा विकासाला विरोध नाही, मात्र शहराची लोकसंख्या लक्षात न घेता मुख्य रस्त्यांची रुंदी अवाजवी आणि मध्यबिंदू ऐवजी एकतर्फी दाखवण्यात आली आहे. गांधी चौक, आंबेडकर पुतळा, ग्रामीण रुग्णालय, चिंतामणी प्लाझा, कवीलकाटे आणि हॉटेल गुलमोहर परिसरातील रस्त्यांच्या अति-रुंदीकरणामुळे स्थानिक लोक बेघर होण्याची भीती आहे. एस.एन. देसाई चौकाप्रमाणे मुख्य ठिकाणी १५ मीटर रुंदीचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे पुरेसा ठरेल. या अवाजवी रुंदीकरणामुळे कुडाळचे श्रद्धास्थान असलेले भैरव मंदिरही बाधित होत असल्याने त्यांनी तीव्र विरोध दर्शवला.

तसेच नगरपंचायतीचे स्वतःचे भूखंड आणि पाणी टाकी सभोवतालची २० गुंठ्यांची मौल्यवान शासकीय जागा आराखड्यातून गायब करण्यामागे नक्की काय 'गोड बंगाल' आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संभाजी महाराज स्मारक: पोलीस स्टेशनजवळील त्रिकोणी शासकीय भूखंडावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे.

 पर्यटकांसाठी पालिकेने स्वतःच्या जागेवर भव्य निवासी प्रकल्प (रेस्ट हाऊस) आणि सावंतवाडीच्या धर्तीवर सुसज्ज जलतरण तलाव उभारावा.

 गणेश घाट ते हायवे पुलापर्यंत ९ मीटरचा बंधारा रस्ता करून तो सांगिर्डेवाडीपर्यंत जोडल्यास उत्तम 'रिंग रोड' तयार होईल, ज्यामुळे बोटिंग व पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळेल.

प्रशासनाने एकाधिकारशाही थांबवून लोकभावनेचा आदर करावा, असे आवाहन करत याप्रकरणी आमदार निलेश राणे यांचे विशेष लक्ष वेधणार असल्याचे राकेश कांदे यांनी स्पष्ट केले.