
बघ्यांची गर्दी
दोडामार्ग : तालुक्यातील मोर्ले गावात रविवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. पंकज गवस यांच्या मांगरात शिरलेल्या सुमारे १५ फूट लांबीच्या अजगराने एक कुत्रा आणि त्याची चार पिल्ले गिळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज गवस यांच्या मांगरात एक कुत्रा व त्याची चार पिल्ले होती. अन्नाच्या शोधात आलेल्या अजगराने त्या ठिकाणी शिरून कुत्रा आणि चारही पिल्ले गिळली. सकाळी पिल्ले दिसत नसल्याने पंकज गवस यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी मांगरात एक भलामोठा अजगर निपचित पडलेला दिसला. त्याचे पोट फुगलेले असल्याने त्याने मोठी शिकार केल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरताच अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती लक्षात घेऊन वनविभागाला माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी अजगराचे सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. त्यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या घटनेमुळे मोर्ले परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने नागरिकांना वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता तत्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.











