LIVE UPDATES

वीजेअभावी सासोली पंपिंग सेंटर बंद

किनारपट्टीवरील लहान - मोठे उद्योजक मेटाकुटीस
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 09, 2026 20:47 PM
views 37  views

  • दोन आठवडे पाणी पुरवठा बंद
  • जबाबदार कोण ? 
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 'महावितरण'कडे बोट 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गेले १४ दिवस दोडामार्ग भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे तिलारी प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा योजना देखील ठप्प झाली आहे. सासोली येथील पंपींग सेंटर बंद झाल्याने गेले दोन आठवडे किनारपट्टी भागासह १९ गावांना होणारा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे वेंगुर्ला, मालवण येथील किनारपट्टी भागातील छोटे- मोठे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. 

दोडामार्ग तिलारी प्रकल्पावरील योजने अंतर्गत सासोली येथे 33 केव्हीए एक्स्प्रेस फिडर घेण्यात आला आहे. हा एक्स्प्रेस फिडर देखभाल दुरूस्ती करिता महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसामुळे फिडरवरती २६ जून रोजी झाड पडून सासोली येथील पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाला. मात्र, वीज कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून अद्याप सासोली येथील एक्स्प्रेस फिडरवरील झाड हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे तिलारी प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा योजने अंतर्गत १९ गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे गेल्या १४ दिवसांपासून ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची दुर्देवी वेळ आली आहे. वेंगुर्ला, मालवण या किनारपट्टी भागात या योजनेतून पाणी पुरवठा होत असल्याने आज तेथील छोट्या-मोठ्या उद्योजकांवर पाण्यासाठी मेटाकुटीला येण्याची वेळ आली आहे. देशातील पहिल्या  पर्यटन जिल्ह्यातील ही परिस्थिती गंभीर असून पर्यटनावर अवलंबून तालुक्यात यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे  पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी यावर तात्काळ कार्यवाही करत येथील १९ गावांना दिलासा देण आवश्यक आहे. 

दरम्यान, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन एक्स्प्रेस फिडरवर पडलेलं धोकादायक झाड हटविण्यासाठी कार्यवाही करण्याचे पत्र महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना २९ जून २०२६ रोजी देण्यात आले. मात्र, वीज पुरवठा अद्याप खंडीत असल्याने अडथळा निर्माण झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उप विभाग सावंतवाडीच्या उपविभागीय अभियंता शिवानी मगदूम यांनी दिली. तर उद्यापर्यंत ही समस्या दूर होणार आहे. आज देखील घटनास्थळी प्रयत्न सुरु असून उद्याच्या दिवसांत खंडीत विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत होईल अशी माहिती महावितरण सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिली आहे.