
सावंतवाडी : अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तफेँ दाखल केलेल्या जनहित याचिकेत दणक्याने शासनाने राज्यात 1440 वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर ) पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
निवडणूक आचारसंहिते पूवीँ ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.आरोग्य विभागाच्या वतीने सरकारी वकिलांनी ही जाहिरात न्यायालयात सादर केली आहे. एम.बी.बी. एस. आणि पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु, रक्तपेढी आणि अन्य रिक्त पदांबाबत अभिनव फाऊंडेशन तफेँ जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयाने खास समिती नेमून अहवाल मागविला आहे. त्यानुसार रिक्त पदांची वस्तुस्थिती समोर आली आहे. उप जिल्हा रुग्णालयातील नऊ वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. दोन वैद्यकीय अधिकारी 2015 पासून सातत्याने गैरहजर आहेत. 1999 मध्ये खंडाळा ( जि.सातारा) येथून रक्तपेढी सावंतवाडी येथे स्थलांतरित झाली. मात्र
शासनाच्या आकृतीबंधानुसार अद्याप रक्तपेढीची पद भरती झालेली नाही. ट्रामा केअर युनिटची सर्व पाच वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. ही बाब अभिनव फाऊंडेशनने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाच्या सत्य शोधन समिती ने पद भरतीची शिफारस केली आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.














