योग व आयुर्वेद यांची नेत्रव्याधींमध्ये उपयुक्तता
आयुर्वेदामध्ये नेत्ररोगांचा उल्लेख शालाक्यतंत्र या विषयामधून केलेला आहे. सुश्रुताचार्यानी नेत्र रोगाचे वर्णन, लक्षणे व त्यांची चिकित्सा सांगितली आहे. तसेच निमीतंत्रामध्ये देखील नेत्राविषयी अनेक विषय वर्णिलेली आहेत.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तसेच, बदलत जाणारी जीवनशैली (Life Style) आणि बदलत जाणारे व्यवसायाचे, कामाचे स्वरुप तसेच पर्यावरणाचा होणारा बदल यामुळे आपल्या सर्व पंचज्ञानेन्द्रियांवर परिणाम होत असतो.
पंचज्ञानेन्द्रियेः नाक, कान, डोळे, जीभ व त्वचा है आहेत.
सर्वेन्द्रियाणां नयनं प्रधानम् |
या सर्व इंद्रियांमध्ये महत्वाचे इंद्रिय म्हणजे डोळा हे होय, कारण बाहेरील जगाच्या प्रत्यक्ष ज्ञानापैकी ८०% ज्ञान हे नेत्रांमुळेच होते. म्हणूनच म्हंटले आहे की,
दृष्टी : प्रसन्नाः सकलं प्रसन्नम् |
दृष्टी व्यवस्थित असेल तर अखिल जग प्रसन्न दिसते. त्यामुळेच आयुर्वेदात नेत्र या अवयवाची विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे. रिमोटने ज्याप्रमाणे रोबोट्सना ताब्यात ठेवले जाते त्याचप्रमाणे सध्याच्या यंत्रयुगात आपण सर्वजण यंत्रांच्या ताब्यात आहोत. तंत्रज्ञान हे एक वरदान समजले जात असले तरीही या तंत्रज्ञानाचे आपल्या शरीरावर विशेषत: डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम देखील लक्षात घेतले पाहिजेत. कोरोना महामारीच्या काळाने आपल्याला स्क्रीनसमोर जास्त वेळ बसण्यास भाग पाडले आणि पर्यायाने, आपण अधिक प्रमाणात यंत्रांच्या स्वाधीन झालो. मुलांच्या ऑनलाईन शाळा, संगणकासमोर तासानतास बसावे लागणे, नोकरदार वर्गासाठी असलेल्या ऑनलाईन बैठका, एवढेच नव्हे तर आपल्या मित्र व कुटुंबीयांचे स्नेहमेळावे देखील व्हिडीओद्वारे भरू लागले.
आपण या नव्या जीवनशैलीला सरावलो खरे; परंतु घरात सुरक्षित राहण्याच्या नादात आपण या सर्व यंत्रांवर अधिकाधिक अवलंबून राहू लागलो. कोणत्याही कारणास्तव स्क्रीनसमोररचा वाढलेला वेळ आरोग्यासाठी घातक असतो तसेच तो डोळ्यांच्या आरोग्यासाठीही घातकच ठरतो. अनेक लोकांना डोळ्यांना थकवा येणे, कोरडेपणा येणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोकेदुखी, डोळ्यांना खाज सुटणे अशी बरीच लक्षणे जाणवतात. अशा वेळी आपण घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आपणच आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायची गरज असते. डोळ्यांचा योग किंवा डोळ्यांचे व्यायाम आपल्या डोळ्यांना आराम देऊन त्यांना पुन्हा ताजेतवाने करण्यास मदत करतात.
◼️ डोळ्यांचा योग म्हणजे काय?
डोळ्यांचा योग म्हणजे काही सोप्या व्यायामांच्या मदतीने आपण नैसर्गिकरित्या डोळ्यांच्या समस्यांना प्रतिबंध करून डोळ्यांचे संरक्षण करू शकतो. डोळ्यांचे हे व्यायाम आपण घरी अथवा ऑफिसमध्ये केव्हाही करू शकतो.
◼️ हे व्यायाम आपण का करावेत?
डोळ्यांचा योग हा संगणकासमोर बसल्याने डोळ्यांना होणाऱ्या त्रासावर (कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम) उपचार करण्याचा एक अत्यंत सोपा व प्रभावी मार्ग आहे. CVS हे सर्वसामान्यपणे डोळ्यांना जाणवणाऱ्या अनेक प्रकारच्या त्रासांचे नाव आहे. यालाच डिजिटल ताण असेही म्हणतात. डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी, मान व खांदे दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांची अतिरिक्त उघडझाप होणे, डोळ्यांना थकवा येऊन डोळे दुखणे, डोळे जड होणे, दृष्टी धूसर होणे, डोळ्यांची एकाग्रता न होणे, डोळ्यांची शक्ती वाढवणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. गेल्या काही वर्षात यंत्रांच्या अतिवापरामुळे लहान मुले व तरुण वर्गांमध्ये CVS चे प्रमाण वाढते आहे.
◼️डोळ्यांचा योग केल्याने काय फायदा होतो?
शारीरिक व्यायाम व योग्य आहाराच्या मदतीने आपण आपल्या शरीराची काळजी घेतो. परंतु,डोळे हा तितकाच महत्वाचा असलेला अवयव मात्र कायम दुर्लक्षित राहतो. डोळ्यांचा योग केल्याने आपल्याला दररोज डोळ्यांची काळजी घेण्याची एक प्रकारची शिस्त लागते. दररोज काही मिनिटे आपल्या डोळ्यांकडे लक्ष दिल्याने आपण डिजिटल ताणावर मात करू शकतो तसेच विविध समस्यांपासून डोळ्यांचा बचाव करू शकतो.
◼️ व्यायाम कधी व कसा करावा ?
◼️ 20-20-20 Formula
कामातून थोडी विश्रांती घेऊन २०-२०-२० हा नियम वापरा. (म्हणजेच २० फूट अंतरावर नजर ठेवून दर २० मिनिटांनी २० सेकंदांचा विराम घ्या)
◼️ .पाल्मिंग-
डोळ्यांना आराम देऊन पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी सर्वोत्तम आणि अतिशय महत्वाचा व्यायाम आहे. हातांचे तळवे एकमेकांवर घासून त्यामध्ये उष्णता व उर्जा निर्माण करा. हे गरम झालेले तळवे दोन्ही डोळ्यांवर ठेवा, असे करत असताना शरीर सैल सोडून दीर्घ श्वास घेत राहा. तासनतास स्क्रीनसमोर बसल्यानंतर किंवा पुस्तक वाचल्यानंतर हा व्यायाम करावा.
◼️ .ब्लिंकिंग :-
डोळे मिचकावणे
डोळे उघडे ठेऊन आरामात बसा.
दहा वेळा जलद गतीने पापण्या फडकवा.
नंतर डोळे बंद करून २० सेकंद आराम करा. सावकाश आपले लक्ष्य श्वासाकडे न्या.
हाच व्यायाम पाच वेळा करा.
◼️ .दोन्ही बाजूंना पाहणे :-
पाय पुढयात सरळ करून बसा.
आता मुठी बंद ठेऊन व हातांचे अंगठे वरच्या दिशेला ठेऊन हात वर उचला.
तुमच्या समोरील डोळ्यांच्या पातळीत असलेल्या एका बिंदूवर नजर स्थिर करा.
ह्या स्थितीत डोके स्थिर ठेवा आणि खालील गोष्टींवर नजर, एकानंतर एकावर फिरवत, केंद्रित करा:
भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
डाव्या अंगठ्याकडे पहा.
पुन्हा भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
उजवा अंगठ्याकडे पहा.
पुन्हा भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
डाव्या अंगठ्याकडे पहा.
असे १०-२० वेळा पुनःपुन्हा करा.
हा व्यायाम झाल्यानंतर डोळे बंद करून आराम करा.
वरील व्यायाम करतेवेळी श्वासाच्या खालील लयबध्दतेवर लक्ष द्या-
शून्य स्थितीत श्वास घ्या.
बाजूंना पाहताना श्वास सोडा.
श्वास घेत पुन्हा मध्य अवस्थेत या.
◼️.जवळ आणि दूर पाहणे :-
खुल्या खिडकीजवळ बसा किंवा असे उभे रहा जेणेकरून क्षितीज दिसेल. हात शरीराच्या बाजूला ठेवा.
नाकाच्या अग्रावर ५-७ सेकंद नजर केंद्रित करा.
असे १०-२० वेळा करा.
डोळे बंद करून आराम करा.
खालीलप्रमाणे श्वासाचा आकृतिबंध पाळा:
नाकाकडे बघताना श्वास घ्या.
क्षितिजाकडे बघताना श्वास सोडा.
वरील सर्व व्यायाम प्रकार करून झाल्यावर काही मिनिटे शवासनात पडून राहा आणि पूर्ण विश्रांती घ्या. सावकाश व नेहमीप्रमाणे श्वास घ्या व सोडा. हे व्यायाम करताना कोणताही विचार अथवा कोणतीही संवेदना रोखू नका.आजच्या घडीला जगातील ३५% लोकांत ऱ्हस्व व दिर्घ दृष्टीदोष कमी-अधिक प्रमाणात आढळतात. हे दोष चष्मा वापरल्याने सुधारतात, पण पूर्ण बरे होऊ शकत नाहीत. खरे तर, जास्ती नंबरचा चष्मा वापरल्याने दृष्टी आणखी बिघडू शकते. म्हणून अगदी शक्यच नसेल तरच चष्मा वापरावा.
मोतीबिंदू व काचबिंदू ह्यांसारखे काही विकार (जीवाणूंमुळे होणारे) वगळता बाकी बरेच डोळ्यांचे विकार हे डोळ्याच्या स्नायूंच्या कार्यातील बिघाडामुळे होतात, ज्याचे कारण हे जुना मानसिक व भावनिक ताण हे असते. योग तंत्राच्या सहाय्याने दृष्टीच्या स्नायूंचे बिघडलेले कार्य सुधारते, जसे ऱ्हस्व दृष्टीदोष व दिर्घ दृष्टीदोष. हे योग व्यायामप्रकार काही महिने नियमित केल्याने डोळ्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.
अनेक नेत्र व्याधी, मधुमेहजन्य नेत्र विकार ( Diabetic Retinopathy), बुबुळावरील जखमा, व्रण ( Corneal Ulcer), वारंवार येणारी रांजणवाडी (Chalazion), डोळे कोरडे होणे Dry eye syndrome, Computer vision syndrome, डोहे सतत लाल होणे, डोळयांना सतत खाज येणे (Allergic Conditions ), डोळयासमोर काळे ठिपके, माश्या व जाळी दिसणे, डोळयातून पाणी येणे,दृष्टी वयानुसार कमजोर होणे (Age Related Macular Degeneration), डोळयावर मांस येणे (Ptyregium),काचबिंदू (Glaucoma), मुलांना लहानपणीच चष्मा लागणे (Myopia, Hypermetropia etc.). डोळयांचा पॅरालिसिस, डोळे तिरळे हाणे (Squint), डोळयाच्या आतील पडदयावर सूज येणे, डोळे दुखणे, डोळयात टोचणे (F.B.Sensation), डोळयाची नस कमजोर होणे (Optic atropy ) इ. आजार हे आपल्याला आपल्या बदललेल्या व विचित्र जीवनशैली (आहार, बिहार इ.) आणि बदललेल्या कामाचे स्वरुप यांनी दिलेली देणगी आहे.
या सर्व विकारांवर योग व आयुर्वेदामधील चिकित्सेचा सुज्ञपणे वापर करुन आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम साधता येतो. लहान मुलांमध्ये बल्य आदि योग देऊन तसेच दोषदुष्य संमुच्र्छना पाहून चिकित्सा केली असता व्याधी शमन होण्यास मदत होते. Eye strain, Dry eye syndrome, computer vision syndrome यामध्ये तर्पण, वेगवेगळे डोळयाचे व्यायाम (Eye exercises, Palming etc.), योग यांचा वापर करुन या विकारांवर मात करता येते. योग साधनेचा उपयोग करुन नेत्र व मन यावर येणाऱ्या ताणामुळे होणारे डोळयांचे विकार, आयुर्वेदिक अभ्यंतर चिकित्सा व पंचकर्म, तसेच षटक्रियाकल्प – पिण्डी, तर्पण, सेक, आश्चोतन, बिडालक, पुटपाक, स्नेहन, स्वेदन इ. कर्माचा व क्रियाकल्पांचा उपयोग करुन वरील सांगितलेल्या विविध व्याधीत यशस्वी चिकित्सा करता येते..
◼️ डॉ. विशाल वि. पाटील
एम. एस. (नेत्र)
9762556121