
चिपळूण : असं म्हटलं जातं की, चिपळूणला पूर हा काही नवा अनुभव नाही. पावसाळ्यात जर मुसळधार पाऊस झाला, तर शहरात पाणी शिरणे ही जणू काही नेहमीचीच बाब झाली आहे. मात्र, आजवर दोन ते तीन वेळा चिपळूणला मोठे महापूर येऊन गेले आहेत. विशेषत: २००५चा पूर आणि २०२१चा महापूर या शहराच्या स्मरणात खोलवर कोरले गेले आहेत. त्यापैकी २०२१चा पूर हा अधिक भयंकर होता. या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली. त्यानंतर चिपळूणकर कायमच भीतीच्या छायेखाली वावरू लागले.
मात्र, २०२१च्या महापुरानंतर चिपळूणकरांनी हार न मानता एकजूट दाखवली. सलग २९ दिवस साखळी उपोषण करत त्यांनी शासनाला जागे केले. या आंदोलनाला आमदार शेखर निकम यांनी ठामपणे साथ दिली. परिणामी शासनाने वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली.
या मोहिमेला नाम फाउंडेशननेही हातभार लावला. नागरिकांच्या आर्थिक सहकार्यातून शिवनदी गाळमुक्त करण्यात आली. आजही वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम सुरूच आहे. मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीतील भागातील गाळ काढण्यासाठी लवकरच परवानगी देऊ, असे आश्वासन मंत्री ना. नितेश राणे यांनी नुकतेच दिले आहे.
गाळ काढण्यासाठी निधी मिळवण्याकरता आमदार शेखर निकम यांनी मोठे प्रयत्न केले. अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून हजारो टन गाळ हटवण्यात आला. याच प्रयत्नांमुळे गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाही, वाशिष्ठी नदीने धोका पातळी ओलांडूनही चिपळूणमध्ये महापुरासारखे चित्र निर्माण झाले नाही.
याचे श्रेय निश्चितच नागरिकांच्या लढाऊ वृत्तीला, उपोषणाला, आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना आणि प्रशासनाच्या पूर्वतयारीला द्यावे लागेल. विशेष म्हणजे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी एप्रिल महिन्यातच आपत्कालीन बैठक घेऊन सर्व स्थितीचा आढावा घेतला होता.
याशिवाय आमदार शेखर निकम यांनी दोन कोटींचा निधी आणून शंकरवाडी-मुरादपूर भागातील ब्रिटिशकालीन नलावडे बंधारा पुन्हा उभारला. हा भाग वारंवार पाण्याखाली जायचा, मात्र आता बंधाऱ्यामुळे पाणी शिरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.
२०२१चा धडा आणि सजग प्रशासन
२०२१ च्या महापुरात रात्रीच्या वेळी अचानक आपत्ती ओढवल्याने कोणीही वेळेत तयार राहू शकले नव्हते. अतिवृष्टीचा इशारा नव्हता, त्यामुळे प्रशासनही निष्क्रिय अवस्थेत होते. मात्र, त्यानंतर प्रशासनाने मोठा धडा घेतला.
आजचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी हवामान खात्याचा इशारा मिळाल्यापासून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले. गेल्या तीन दिवसांपासून ते रात्रंदिवस काम करत असून दर अर्ध्या तासाने नागरिकांना वाशिष्ठीची पातळी आणि परिस्थितीची माहिती देत आहेत. यामुळे नागरिकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे हे सर्व अधिकारी सतत ॲक्शन मोडवर आहेत. दिवसभर फील्डवर जाऊन ते स्वतः नागरिकांना दिलासा देत आहेत.
एनडीआरएफची टीमही सज्ज आहे. काही ठिकाणी तर अधिकारी स्वतः पाण्यात उतरून नागरिकांना मदत करताना दिसले. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावर विश्वास दुणावला आहे.
अधिकारी आणि त्यांचे प्रयत्न
मुख्याधिकारी विशाल भोसले यांची टीम सतत सतर्क आहे. व्यापारी आणि नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. नुकतेच आजारातून बाहेर पडलेले श्री. भोसले यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून पावसात रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेत घालवले.
दुसरीकडे, नवनियुक्त डीवायएसपी प्रकाश बेळे यांनी अवघ्या काही दिवसांतच लोकांचे मन जिंकले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे नागरिकांना सुरक्षिततेची भावना मिळाली आहे.
नागरिकांचा आत्मविश्वास
वाशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी झटणारे चिपळूणकर, त्यांना साथ देणारे आमदार शेखर निकम, सतत सजग असलेले प्रांताधिकारी आकाश लिगाडे, प्रकाश बेळे, विशाल भोसले, प्रवीण लोकरे आणि एनडीआरएफची टीम, या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे चिपळूण आज सुरक्षित आहे.
रात्र वैऱ्याची आहे
आजही पाऊस जोरदार कोसळतो आहे, उद्याही रेड अलर्ट आहे. रात्र वैऱ्याची आहे. पण नागरिकांमध्ये आत्मविश्वास आहे, कारण प्रशासन त्यांच्या सोबत आहे. आणि “आम्ही चिपळूणकर आहोत, एकजूट आहोत, सजग आहोत,” ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली आहे.
या सर्व संघर्षांना आणि प्रयत्नांना मनापासून सलाम!